पोलिसांना नक्कीच या प्रकरणाने शिकवण मिळणार आहे. योग्य वेळी, योग्य तपास झाला असता तर यात काहींचे जीव वाचले असते. नवे चार्ल्स शोभराज किंवा महानंद नाईक गोव्यात तयार होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी प्रत्येक गुन्ह्यावेळी आपल्या तपासात गांभीर्य दाखवणे गरजेचे आहे.

काही वर्षांपूर्वी चार्ल्स शोभराज गुन्हे करून नंतर गोव्यातही राहून गेला होता. ‘सीरियल किलर’ म्हणून प्रसिद्ध असलेला आणि पोलिसांना हवा असलेला हा कैदी शिताफीने तुरुंगातून पळून गोव्यात येऊन आरामात राहत होता. गोवा नेहमीच अशा गुन्हेगारांसाठी आश्रय देणारे राज्य ठरले आहे. अनेक प्रकारचे गुन्हेगार वेगवेगळे गुन्हे करून
गोव्यात येऊन नाव बदलून राहतात. चार्ल्स शोभराजच्या अटकेनंतर गोवा बराच प्रसिद्धीत आला. ‘बिकिनी किलर’ असा टॅग त्याला लागला होता. त्याला साप म्हणजेच ‘सर्पंट’ म्हणायचे. विशेष म्हणजे पश्चिमी पर्यटकांना तो लुबाडायचा आणि त्यांची हत्या करायचा. मूळ फ्रान्सचा नागरिक असलेल्या, चार्ल्स शोभराजने २० पेक्षा जास्त खून केल्याचा आरोप आहे. भारतासह नेपाळ, थायलंड, मलेशियामध्येही त्याने गुन्हे केल्यामुळे तो जगातील एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार सिद्ध झाला. एखाद्या गुन्हेगाराच्या कृत्याची कॉपी करण्याचे प्रकार नेहमीच होत असतात. काहीवेळा एखादा असा ‘सीरियल किलर’ सापडला की तो चार्ल्स शोभराज किंवा रमण राघव किंवा महानंद नाईक सारखा आहे, असे तर्क काढले जातात. महानंद नाईक हा गोव्यातील गुन्हेगार, ज्याने अनेक मुलींचे खून केले. तो आता कोलवाळ तुरुंगात आहे. या गुन्हेगारांच्या नावांची चर्चा सध्या व्हायला कारणही तसेच आहे. गोव्यात एका रशियन नागरिकाने दोन विदेशी मुलींचे खून केले. दोघांचेही गळे चिरून त्यांची हत्या केली. या संशयित आरोपीने आपण फक्त दोनच नव्हे, तर अनेकांना यमसदनी पाठवल्याचे पोलिसांना सांगितले. याच दिवसांमध्ये एका आसामी महिलेचा तिच्या राहत्या खोलीत मृतदेह आढळला होता. तिलाही आपण मारल्याचे तो पोलिसांना सांगतो. गोव्यासह हिमाचलमध्ये आपण असा अनेकांना मोक्ष दिल्याचे तो सांगत असला तरी पोलीस मात्र त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस धागेदोरे शोधत आहेत. त्याने जी माहिती सुरुवातीला उघड केली, त्याने पोलिसांची झोप उडाली आहे. कारण पोलीस अनेकदा काही मृतदेहांबाबत अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करतात. त्यामुळे अशा आरोपीच्या सांगण्यावरून ते जर आता खून ठरले तर पोलिसांची पंचाईत होणार आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन संशयिताची जबानी घेतली, पण अद्याप पोलिसांकडून अधिक माहिती उघड केलेली नाही. सध्या दोन खुनांचाच आरोप या रशियन नागरिकावर आहे.
आलेक्स लिओनोव असे या संशयिताचे नाव असून आपण दोनपेक्षा जास्त खून केल्याचे तो वारंवार सांगत आहे. आपण हे खून करत नाही तर माणसांना मोक्ष देतो, असा त्याचा दावा आहे. त्यामुळेच पोलीस चक्रावले आहेत. त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा की त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे, हेही अद्याप पोलिसांना कळलेले नाही. कारण त्याने जे दोन खून केले आहेत, ते अत्यंत निर्घृणपणे केले आहेत. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणे पोलिसांना भाग पडले आहे. या आरोपीने केलेले दावे खरे आहेत का, ते तपासण्यासाठी पोलिसांनी हयगय करू नये. यातून खरोखरच एखादे मोठे हत्याकांडही समोर येऊ शकते. गोव्यात येणारे अनेक विदेशी नागरिक गोव्यात हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा खुल्या जागेत विशेषतः जंगलात राहणे पसंत करतात. पेडणेतील जंगल परिसरात रशियनांचे अशा प्रकारचे अड्डेच आहेत. या संशयिताने केलेल्या कृत्यामुळे गोव्यातील रशियन पर्यटकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याने दिलेली माहिती खरी ठरली, तर हे एक मोठे हत्याकांड ठरणार आहे.
पोलिसांनाही अशा प्रकरणातून काही बोध घेण्याची गरज आहे. अनेक प्रकरणांत सखोल चौकशी करण्यापूर्वी अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरणे नोंदवून ती बंद केली जातात. पेडणेत घडलेल्या रशियनच्या सीरियल किलिंग प्रकरणात एका मृत्यूनंतर पोलीस तपासाची चक्रे योग्य दिशेने फिरली असती, तर दोघांचे किंवा किमान एकाचा जीव वाचला असता. संशयित दावा करीत असल्याप्रमाणे या प्रकरणाची व्याप्ती मोठी नसेलही किंवा असेलही, पण पोलिसांना नक्कीच या प्रकरणाने शिकवण मिळणार आहे. योग्य वेळी, योग्य तपास झाला असता तर यात काहींचे जीव वाचले असते. नवे चार्ल्स शोभराज किंवा महानंद नाईक गोव्यात तयार होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी प्रत्येक गुन्ह्यावेळी आपल्या तपासात गांभीर्य दाखवणे गरजेचे आहे.