अष्टसात्विकाचे पुराड

एका शीत-रश्मी चंद्राला दुसरा चंद्र भेटायला यावा किंवा तुल्य जलौघांचा प्रयागी संगम व्हावा तशा प्रकारे जेव्हा भक्त एकमेकांना भेटतात तेव्हा सामरस्याचा पूर लोटतो! असा पूर लोटला की मग तिथे अष्टसात्विकाचे पुराड साचते!

Story: विचारचक्र |
18th January, 11:35 pm
अष्टसात्विकाचे पुराड

कृष्ण कृष्ण जय।।

मागील लेखात आपण भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायाच्या सातव्या श्लोकाच्या विस्तृत विवेचनाच्या शेवटास पोचलो होतो. त्यात भगवंत शिष्योत्तम पार्थास विदित करतायत् की अभेदभक्तियोग हा सदासर्वदा उत्तम, कारण त्यात तन्मय असलेला माझ्यापासून कधीही विलग होत नाही. तो आचरताना जरी अडथळा आला तरी तो अडथळा सुखावहच असतो! 

भगवंत पुढे त्यास म्हणतात की, तो अभेदभक्तियोग सुखावहच कसा असा विचार जर तुझ्या मनात आला असेल तर जरा मागे वळून बघ; त्याचे निरुपण मी सहाव्या अध्यायाच्या विस्तृत विवेचनात केलेले आहे.

तरी ती अभेद-भक्ती म्हणजे काय ते आता परत ऐक. 

अहं सर्वस्य प्रभवो मत्त: सर्व प्रवर्तते।

इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विता:।।८।।

सरळ अर्थ : 'मी वासुदेवच सर्व जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे व माझ्यामुळेच सर्व जगत् कर्म करीत आहे,' याप्रमाणे तत्वतः जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त झालेले बुद्धिमान भक्तजन मज परमेश्वरालाच निरंतर भजतात.

विस्तृत विवेचन : या सगळ्या जगाचा जन्मदाता मीच आहे आणि सगळ्यांचे पोषण करणाराही मीच आहे. पाण्यात लाटा निर्माण होतात. व लाटांनाही त्या पाण्याचाच आधार व आश्रय असतो. त्या लाटाही पाण्याच्याच असतात आणि पाणी हेच त्यांचे जीवनही असते. तसा या अख्ख्या विश्वात परिपूर्णपणे सगळीकडे भरून राहिलेला असा मी एकच आहे आणि माझ्याशिवाय दुसरे काही नाही. अशा मला सर्व-व्यापकाला व्यवस्थित पूर्णपणे ओळखून जिथे कुठे असतील तिथे जे प्रेमभावाने भजतात त्यांचे चित्त अखंडितपणे प्रफुल्लित झालेले असते.

जसा वायू आकाशरूप होऊन आकाशातच अविरत विहरत व खेळत असतो, त्याप्रमाणे देश-काळ-वर्तमान हे सगळे माझेच रूप मानून ते आत्मज्ञानी असलेले माझे भक्त अत्यंत भावुकपणे मला जगद्रूपाला आपल्या हृदयात साठवून सुखाने निवांतपणे त्रैलोक्यात विहार करतात. म्हणून जगात जो जो म्हणून कोणी जीव दृष्टीस पडेल त्याला मनोभावे देव मानावा. हे कपी-ध्वजा, हाच माझा भक्ती-योग होय हे तू निश्चितपणे जाण.

मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्त:

 परस्परम् ।

कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ।।९।।

सरळ अर्थ : आणि ते निरंतर माझ्या ठिकाणी मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे भक्तजन सदासर्वदा माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परांना माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभाव यासह माझेच कीर्तन करीत संतुष्ट होतात व मला वासुदेवाच्या ठिकाणीच निरंतर रममाण होतात.

विस्तृत विवेचन : भक्तांचे चित्त माझ्या रूपात तल्लीन होते. त्यांचा प्राणही मद्रूपीच तल्लीन होतो. याप्रमाणे मद्रूपात रंगलेले असताना ते जन्म-मरणाची कल्पना/भावना विसरतात आणि त्यायोगे ते ज्ञानबोधात रमतात. मग त्या ज्ञानबोधाच्या धुंदीत म्हणा वा तंद्रीत म्हणा संवादाचे सुख नाचायला लागते. आता एकमेकांना बोध द्यावा व घ्यावा ही प्रक्रिया सुरू होते! जणु काही शेजारची सरोवरे तुडुंब भरून एक झाली आहेत! त्यात उचंबळून येणाऱ्या लाटांना एकमेकांचा आधार मिळतो. तसे हे भक्त एकमेकांना भेटले की स्वानंदाच्या लाटा उचंबळून येतात आणि मग तिथे ज्ञानाचे लेणे लेवून आत्मज्ञानच आत्मज्ञानाला शोभिवंत होते. जणू काही एका सूर्याला दुसरा सूर्य ओवाळायला यावा, किंवा एका शीत-रश्मी चंद्राला दुसरा चंद्र भेटायला यावा किंवा तुल्य जलौघांचा प्रयागी संगम व्हावा तशा प्रकारे जेव्हा भक्त एकमेकांना भेटतात तेव्हा सामरस्याचा पूर लोटतो! असा पूर लोटला की मग तिथे अष्टसात्विकाचे पुराड साचते!

'अष्टसात्विक' म्हणजे अष्ट सात्विक भाव. सत्वगुणाचे आठ भाव. भक्तिप्रेमाने अंत:करण भरून गेल्यामुळे प्रतीतीस येणारे परिणाम. ते असे आहेत - १) स्तंभ म्हणजे स्तब्धता. २) स्वेद म्हणजे घाम फुटणे. ३) रोमांच म्हणजे शरीरावरील केस उभारले जाणे. ४) स्वरभंग म्हणजे आवाज बदलणे. ५) कंप म्हणजे शरीर कांपणे. ६) वैवर्ण्य म्हणजे चेहेऱ्याचा रंग बदलणे, आरक्त किंवा फिकट होणे. ७) अश्रुपात म्हणजे डोळ्यांतून आनंदाश्रु येणे व ८) प्रलय म्हणजे निश्चेष्टता, भावसमाधी.

म्हणजे अष्ट सात्विक भावांचा गाळ भक्तांवर साचायला लागतो! 

अर्जुना, तिथे संवादाचा चतुष्पथ म्हणजे चौक सजतो आणि भक्त त्याचा अधिपती होतो. अशातून ब्रह्मानंद बहरून आल्यामुळे देह-भान ओसरून जाते! माझ्या रंगांत रंगले की भक्त तृप्त होतात, धन्योद्गाराने उदंड गर्जतात. सद्गुरू शिष्याला एकांतात नेऊन ऊँकाराची जी खूण दाखवतात तोच उपदेश ते सद्गुरुशिष्य भक्त मेघगर्जनेपरी त्रैलोक्याला सांगायला लागतात! मिटलेली, अजून न उमललेली पद्मकळी उमलल्यानंतर जशी अंतरीचा मकरंद लपवून न ठेवता राजा आणि रंक या सगळ्यांना त्या सुगंधाचे भोजन समान वाटते, त्याचप्रमाणे ब्रह्मानंद बहरून आल्याने देहभान ओसरलेले ते भक्त स्वानंद-भरात येऊन माझे वर्णन विश्वात सगळीकडे करायला लागतात. माझ्या संकीर्तनात आनंद-निर्भर झाल्यामुळे त्यांना बाकी सगळ्याचा विसर पडतो व अंगे-जीवे ते स्वतः तो परमानंदच होऊन जातात. त्या माझ्या प्रेमरंगी त्यांना रात्र, दिवस कशा कशाचेही भान राहत नाही आणि अशारीतीने ते माझे सर्वांग संपूर्ण सुख आपलेसे करून घेतात.

(क्रमश:)


- मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल 

असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३