
राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये एकामागोमाग घडलेले खून, दरोडे, चोरी व इतर गुन्हेगारी कृत्ये पाहिल्यास कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र समोर येत आहे. यात प्रामुख्याने रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला, म्हापसा, वास्को येथील दरोडे, हडफडे येथील बर्च क्लबमधील अग्नितांडव, दिवसाढवळ्या चोरी, भूखंड हडप आणि टोळीयुद्ध यासारख्या घटनांनी सामान्य गोमंतकीयांच्या सुरक्षेची चिंता वाढवली आहे. या घटनेची दखल घेतल्यास पोलीस व इतर यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. मांद्रे पोलीस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या रशियन महिलांच्या दुहेरी खुनाने पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. याच परिसरात अवैध वाळू उत्खननाशी निगडित असलेल्या घटनेत दोन व्यक्तींचा बळी गेला. याशिवाय मोरजी आणि साळगावमध्ये नोव्हेंबर महिन्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा खून झाला. या खुनातील मुख्य संशयित अजून पोलिसांना सापडले नाहीत.
फातोर्डा पोलीस स्थानकाच्या हद्दीत मुंगूल - माडेल येथे १२ ऑगस्ट २०२५ रोजी गाडी अडवून तलवार, कोयता, सोडा बॉटल्सचा वापर करत संशयितांनी गोळीबारही केला होता. १८ सप्टेंबर २०२५ रोजी करंझाळे येथे रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. वरील दोन्ही प्रकरणात स्थानिकांचा समावेश असल्यामुळे त्यांच्यावर अटक करून कारवाई करण्यात आली.
नागाळी - दोनापावल येथील उद्योजक जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यावर २० एप्रिल २०२५ रोजी उत्तररात्री दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी धेंपो दाम्पत्याला कोंडून पैसे आणि दागिन्यांची लूट केली होती. म्हापसा परिसरात डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान सहा बुरखाधारी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला होता. घाणेकर कुटुंबियांना बंधक बनवून घरातील ३५ लाखांचा मुद्देमाल पळवला होता. या दोन्ही प्रकरणांत रेकी करणारा आणि दरोडेखोरांच्या टोळीला मदत करणाऱ्या संशयितांना अटक करण्यात आली, तर मुख्य सूत्रधार बांगलादेशात पळून जाण्यास यशस्वी ठरले. याच दरम्यान नोव्हेंबरमध्ये बायणा येथील चामुंडी आर्केड इमारतीत सशस्त्र दरोडेखोरांनी सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या सागर नायक यांच्या फ्लॅटमध्ये घुसून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लुटली होती. यातील संशयितांना पोलिसांनी मुंबईतून अटक केली. वरील गुन्हेगारी कृत्ये सुरू असताना हडफडे येथील बर्च क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. यात पोलिसांनी क्लब मालक लुथरा बंधूंसह इतरांवर कारवाई केली. या गुन्हेगारी कृत्यांची दखल घेतल्यास गोव्यात मागील काही महिन्यांत दरोडा, खून, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांची वाढ झाली आहे. या गुन्हेगारी वाढीमुळे कायदा व सुव्यवस्था कोलमडल्याचा स्पष्ट इशारा मिळतो. तसेच गंभीर गुन्ह्यात परप्रांतीयांचा सहभाग असल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी गंभीरपणे भाडेकरू तसेच कामगारांची पडताळणी करणे आवश्यक आहे. नाकाबंदी, गस्त घालणे, तसेच पोलीस आणि सामान्य जनतेत संवाद प्रभावीपणे राबवणे महत्त्वाचे आहे. याशिवाय पोलीस खात्यात मोठ्या प्रमाणात राजकीय वशिलेबाजी होत असल्याचे नेहमी बोलले जात आहे. त्यामुळे सरकारने राजकीय हस्तक्षेप न करता पोलीस खात्याची व्यवस्था दुरुस्त करून कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा मजबूत करण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलावीत.
- प्रसाद शेट काणकोणकर