देशात जनगणनेनंतर लोकसभा, विधानसभा मतदारसंघांची फेररचना होणार आहे. राज्यातील मतदारसंघ वाढावेत यासाठी विजयनगरचे टीडीपीचे खासदार अप्पाला नायडू यांनी तिसरे अपत्य जन्माला घालणाऱ्या महिलेला ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. तिसरे अपत्य मुलगा झाल्यास त्या महिलेला गाय भेट दिली जाईल. यासाठी येणारा खर्च स्वतःच्या पगारातून करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जागतिक महिला दिन कार्यक्रमातील त्यांचे हे भाषण व्हायरल झाले. विशेष म्हणजे नायडू यांचा हा व्हिडिओ टीडीपी नेते आणि कार्यकर्ते सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत आहेत. अप्पाला नायडू यांची ही घोषणा राज्यात लोकसंख्यावाढीसाठी क्रांतिकारी पाऊल ठरेल, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही त्यांच्या खासदाराचे कौतुक केले आहे. लोकसंख्या वाढीचे समर्थन करताना मुख्यमंत्री म्हणतात, भारताकडे अधिक लोकसंख्येमुळे अधिक फायदा आहे. योग्य नियोजन केले तर भारतीयांना भविष्यात चांगले दिवस येतील. जागतिक पातळीवर सेवांमध्ये इतर देशांना भारतीयांवर अवलंबून राहावे लागेल.
चंद्राबाबू नायडू यांनी महिला कर्मचाऱ्यांना मातृत्व रजा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांची संख्या कितीही असली तरी प्रसूती रजा दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तरुणांची संख्या वाढावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्याचे आवाहन केले होते. यावर कडी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कायदा करण्याचीच भाषा केली आहे. ते म्हणतात, दोन किंवा त्याहून अधिक मुले आहेत, त्यांनाच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढवता येतील. केवळ राजकीय स्वार्थापोटी लोकसंख्या वाढीचे समर्थन करणे कितपत योग्य आहे? खासदारसाहेबांनी ५० हजार रुपये देण्याची केलेली घोषणाही तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. कारण त्यांच्या मतदारसंघापुरते बोलायचे म्हटले तरी तिसरे अपत्य जन्माला देणाऱ्या महिलांची संख्या महिन्याला किती असेल? प्रत्येकीला ५० हजार रुपये ते त्यांच्या वेतनातून देणार आहेत. म्हणजे त्यांचे वेतन असे आहे तरी किती? जमीन, पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी लोकसंख्या वाढली म्हणून वाढणार नाहीत. बेरोजगारीची समस्या आताच आवाक्याच्या बाहेर आहे. अर्थात राजकीय स्वार्थच पहाणाऱ्यांना या समस्या दिसणार नाहीत.
प्रदीप जोशी,
(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)