बलुचिस्तानमुळे पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात

Story: विश्वरंग |
14th March, 08:59 pm
बलुचिस्तानमुळे पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात

बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांत सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. या दोन प्रांतांमध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ल्यांची संख्या वाढली आहे. आकडेवारीनुसार, २०२४ या वर्षात दहशतवादी हल्ल्यांमध्ये २,५२६ लोकांचा मृत्यू झाला, जे २०२३ च्या तुलनेत ९० टक्के अधिक आहे. यामध्ये ७०० पोलीस कर्मचारी, ९०० पेक्षा जास्त सामान्य नागरिक आणि ९०० पर्यंत सशस्त्र जवानांचा समावेश होता.

पाकिस्तान सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार, बलुचिस्तानमध्ये वाढते लष्करी जवान आणि राज्यातील राजकीय परिस्थिती यासाठी जबाबदार आहेत. येथील नवाबांनी राजकीय पकड गमावली आहे. दुसरीकडे, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)ला आंतरराष्ट्रीय थिंक टँकनी सर्वात वेगाने वाढणारा दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे. पाकिस्तान सरकार बलुचिस्तानमधून बलुचांना हुसकावून लावण्यासाठी वारंवार सैन्य कारवाई करत आहे. या कारवाईची दोन मोठी कारणे आहेत. पहिले, बलुचिस्तानची भौगोलिक स्थिती, जी जगातील सर्वात श्रीमंत ठिकाणांत स्थान देते. हा भाग पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिमेत आहे. देशाचा ४४ टक्के भूभाग हाच आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रात पाकिस्तानची एकूण लोकसंख्या फक्त ३.६ टक्के म्हणजे, १.४९ कोटी लोकच येथे राहत आहेत. दुसरे, या जमिनीखाली असलेले तांबे, सोने, कोळसा, युरेनियम आणि अन्य खनिजांचे भांडार आहे. पाकिस्तानातील हे सर्वात श्रीमंत राज्य आहे. असे असताना हा भाग पाकिस्तानच्या सर्वात मागास भागापैकी एक आहे. पाकिस्तान या अनमोल खाणी चीनला देऊन पाकिस्तान आपले नशीब पालटवू इच्छित आहे.

पाकच्या लष्कराने गेल्या ७५ वर्षांपासून बलुचिस्तान येथे दबाव तंत्राचा वापर केला आहे. पण काहीही परिणाम झाला नाही. या भागात बंडखोरांचे समांतर सरकार आहे. पाक लष्कर रबर स्टॅम्पसारखे झाले आहे. पण आता पाकव्याप्त काश्मीर भागातील जनआंदोलनही पाकसाठी डोकेदुखी बनले आहे. पाकपासून मुक्ततेसाठी इथे जोरदार आंदोलने सुरू आहेत. आंदोलक संघटनांना युरोपिय देशांचा पाठिंबा आहे. पीओकेच्या लोकांना पाकिस्तान दुय्यम वागणूक देत आहे. येथे वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधाही दिल्या जात नाहीत. त्यामुळे आता पुढची वेळ पीओकेची असेल. लष्करप्रमुख मुनीर यांनी अलीकडेच पीओकेमध्ये चार अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत. या भागात लोकांमधील असंतोष मोठ्या प्रमाणावर भडकला असल्याची पाकच्या लष्कराला जाणीव आहे. येथील लोकही आता आपल्या हक्कांसाठी संघटित होऊन आवाज उठवत आहेत. त्यामुळे पाकचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

सुदेश दळवी