राज्याच्या मंत्रिमंडळात पुढील पंधरा दिवसांत फेरबदल होतील असे म्हणत, विधानसभेचे सभापती असलेल्या रमेश तवडकर यांनी गेल्या अडीच वर्षांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू असलेल्या चर्चांना तोंड फोडले. पहिल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आमदार नीलेश काब्राल, दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, डिलायला लोबो आणि मायकल लोबो यांच्या नावांचा मंत्री म्हणून विचार होऊ शकतो, असे नमूद करतानाच चांगली खाती मिळत असतील तर आपणही मंत्रिपदाचा विचार करू. अन्यथा सभापतीपदावरच राहणे ठीक समजेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या दिवशी मात्र मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आहे असे सांगत, मंत्रिपदाबाबत मीडियात जी नावे येत होती, तीच नावे आपण घेतल्याचा दावा करीत त्यांनी हात झटकले. पण, चक्क सभापतींनी या विषयावर भाष्य केल्याने पुढील काहीच दिवसांत मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकारणात सातत्याने वेगवेगळे प्रयोग करून जनतेसमोर जाण्याचे प्रयोग भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून वारंवार सुरू आहेत. २०१४ मध्ये देशाची सत्ता काबीज केल्यापासून केंद्रातील मोदी-शहा ही जोडगोळी वारंवार अशापद्धतीचे प्रयोग राबवून राजकीय जाणकारांनाही बुचकळ्यात टाकत आहे. गोव्याच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत त्यांनी दोन-अडीच वर्षांपूर्वीच दिले होते. त्यानंतर केवळ एकदाच लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आलेक्स सिक्वेरांना मंत्रिपद देऊन फेरबदल करण्यात आला. त्यानंतर मात्र याबाबत केवळ संकेतच देण्यात आले. आता मात्र राज्यातील आगामी जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी मंत्रिमंडळात नवे चेहरे सहभागी करण्याचे ठरवल्याचे प्रदेश भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून समजते. परंतु, सध्या मंत्रिपदासाठी जे गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत, त्यांना मंत्रिपद मिळणार की वेगळ्याच चेहऱ्यांना मंत्री बनवून मोदी-शहा गोमंतकीयांनाही चकवा देणार, हे पुढील काहीच दिवसांत स्पष्ट होईल.
सभापती रमेश तवडकर यांनी पुढील पंधरा दिवसांत मंत्रिमंडळ फेरबदल होईल असे स्पष्ट संकेत दिल्याने विद्यमान मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना घाम फुटला आहे. तर, इच्छुकांच्या आशा मात्र पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. पण, मंत्री आणि भाजप आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पाठवलेला अहवाल, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भूमिका आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सादर केलेले प्रगतीपुस्तक या सर्व गोष्टींचा मंत्रिमंडळ फेरबदलावेळी निश्चित विचार होणार आहे. एकंदरीत, तीन निष्क्रिय मंत्र्यांना डावलून त्यांच्याजागी इतर तीन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे भाजपने तूर्त ठरवले आहे. आता भाजपच्या दृष्टीने ते तीन निष्क्रिय मंत्री कोण, हे फेरबदलावेळीच समजेल.
- सिद्धार्थ कांबळे