विश्व हिंदू परिषदेचे आज राज्यव्यापी आंदोलन
छत्रपती संभाजीनगर : मुघल बादशाह औरंगजेबाची कबर आणि त्याची निशाणी हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदची मोहीम सोमवारपासून सुरू होत आहे. हिंदू पंचांगानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात जिल्हा स्तरावर धरणे आंदोलन आणि दिल्लीत निवेदन सादर केले जाईल.
विश्व हिंदू परिषदचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितले की, 'विहिंप' आणि 'बजरंग दलाचे पदाधिकारी राज्यात असलेल्या औरंगजेबाच्या मूर्ती आणि औरंगाबादमधील खुलताबाद येथील कबर हटवण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करतील.
पोलिसांबरोबरच पुरातत्त्व विभागाचेही कर्मचारी तैनात -
विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी औरंगजेब कबर परिसराची पाहणी करून बंदोबस्त तैनात केला आहे. मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. औरंगजेबाची ही कबर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने पोलिसांबरोबरच पुरातत्त्व विभागानेही कर्मचारी तैनात केले आहे.
काय आहे हे प्रकरण-
मुघल शासक औरंगजेब आणि त्याच्या कबरीविषयी गेल्या काही दिवसांपासून, राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. औरंग्याची कबर महाराष्ट्रात काय भारतात कुठेही नको. राज्य सरकारने पुढील काळात केंद्र सरकारशी चर्चा करून औरंगजेबाची कबर नियमानुसार काढावी, नाहीतर बजरंग दल कारसेवा करुन ही कबर काढून टाकेल.