माणूस आपले माणूसपण विसरत चाललाय !

आपल्या शिक्षणात जाणीवपर्वक कार्यकारणभाव समजून घेणे आणि आपल्या जडणघडणीत वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारणे फार महत्वाचे आहे. ते एका रात्रीत होणार नाही, पण जागृती करणे गरजेचे आहे.

Story: विचारचक्र |
14th March, 09:01 pm
माणूस आपले माणूसपण विसरत चाललाय !

बोलता बोलता ‘आपल्या बाळाला बरं नाही’ म्हणून सांगितले तर अनेक लोक, आपले शेजारी, सहकारी, मित्रमैत्रिणी, एवढेच नव्हे तर बसमधली अनोळखी बाईसुद्धा आपल्याला सल्ला देते. छोट्या मुलाला घेऊन कुठे डॉक्टरकडे गेलो तरी बाहेर रांगेत उभ्या असलेल्या आया आपल्याला सल्ला देतात. सार्वजनिक जागेत गर्दीच्या ठिकाणी एखाद्या पडणाऱ्या मुलाला धावत जाऊन आजूबाजूचे लोक उचलतात. लहान बाळाला घेऊन बसमध्ये चढलेल्या आईला लगेच कुणीही उठून जागा रिकामी करून बसायला देतात. तात्पर्य, लहान मूल हे सगळ्यांसाठीच जीव की प्राण, मग ते आपले असो की दुसऱ्याचे. लहान मुलाला काही झाले तर सगळीच लोक हळहळतात. अशा परिस्थितीत उसगावातील कसलये वाड्यावर घडलेली गोष्ट ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे.

आपल्याला मूल होत नाही म्हणून दुसऱ्याच्या मुलाचा जीव घेणे हे कुठल्याही दगडाच्या काळजाच्या माणसालासुद्धा जमणार नाही. या घटनेला किती आणि काय काय कंगोरे आहेत, हे उघड होईलच. पण कृत्य कुठल्याही बाजूने समर्थनीय नाहीच. शिवाय जास्तीत जास्त कडक शिक्षेस पात्र आहे.

 माणसाला समाजाची काही बंधने असतात आणि ती पुरुष, स्त्रियांना वेगळी असली तरी दोघांसाठीही असतात. मूल मोठे झाले की व्यवस्थित शिकायला पाहिजे, त्याने नोकरी, व्यवसाय करून स्थिरस्थावर झाले पाहिजे. नंतर त्याचे लग्न झाले पाहिजे. नंतर त्याला मूल झाले पाहिजे. समाजाचा घटक म्हणून ही बंधने बहुतेक लोक पाळतात. वेगळ्या वाटा चोखाळणारीही माणसे आहेत. तरीही सामाजिक दबाव वा बंधने ही दृष्य स्वरुपाची नसली तरी ती असतात. मुलगा असला तर त्याला ‘ब्रेड विनिंग’चा दबाव असतो. सामाजिक चौकटीने घालून दिलेले सगळे नियम लागतात. तीच मुलगी असली तर किंवा बाई असली तर ‘ब्रेड विनिंग’चा तेवढा दबाव नसला तरी लग्नाचा असतो. समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य वेळेवर लग्न झालेच पाहिजे, लग्न झाल्यानंतर मूल झालेच पाहिजे. मग मुलगा झालाच पाहिजे. असे अनेक अदृश्य नियम असतात.

 या सामाजिक चौकटीच्या आत काही गोष्टी होत नसल्यास मग डॉक्टर, बुवा, बाबा, साधू, साध्वी यांच्याकडे लोक जातात. आपल्या मुलामुलींना गंडे दोरे बांधून मानसिक गुलामगिरीचा आपला वारसा पुढे चालवतात. अशा वातावरणात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव समजून घेऊन विचार करणारी पिढी तयार होणे कठीण होते.

महाराष्ट्रात जसा जादूटोणा विरोधी कायदा आहे तसा कायदा आपल्या गोव्यात असण्याची गरज वाढलेली आहे. अशा अनेक घटना कमी जास्त तीव्रतेच्या समाजात घडत असतात. श्रद्धा अंधश्रद्धा यांच्या सीमारेषा धुसर व्हायला लागल्या की आपला ताबा जातो. मानसिक गुलामगिरीच्या अधीन होणे म्हणजे आपली बुद्धी गहाण टाकणे. मग ‘बाबाम् वाक्यम् प्रमाणम्.’ इप्सीत साध्य करण्यासाठी सारासार विचार न करता आंधळेपणाने एका काल्पनिक जगाची प्रतिमा तयार करून अघोरी कृत्य करण्यास प्रवृत्त होतो. 

तसे बघायला गेलो तर सामाजिक दबाव हा आपल्या मनात जास्त असतो. भाड्याने दुसऱ्या जागेवर राहायला आलेल्या किंवा नवीन जागा घेऊन राहायला आलेल्यांना हे बंधन शिथील असते. पण नवीन जागेत आपला जम बसवण्यासाठी आपण स्वत:वरच काही प्रमाणात दबाव लादलेला असतो. आपल्याला मूल नाही, हे दुसऱ्यांपेक्षा आपल्यालाच जास्त सलत असते. त्यातून मग सल्ल्यासाठी आपण कुणाकडे जातो हे महत्वाचे. अशा समयी असे अघोरी सल्ले देण्याऱ्यांच्याही मुसक्या आवळल्या पाहिजेत. जेणेकरून भविष्यात असे सल्ले देण्याचे कुणी धाडस करणार नाही. अमर्याद दानधर्मापर्यंत मर्यादित न राहता आता देवदेवचार बळी मागायला लागलेत, तर हे मधले ‘पोस्टमन’ चांगलेच माजलेत म्हणायला हरकत नाही. पूर्वी काही ठिकाणी कोंबड्याचा बळी देत होते, ते सुद्धा आता कोंबडा न कापता त्या त्या देवाच्या नावाने त्याच्यावर पाणी सोडून, त्याला सोडून देतात. असे अनेक कोंबडे त्या स्थळावर फिरताना आपल्याला दिसतात. असे कोंबड्यांच्या बाजूने घडत असताना माणसाच्या बाबतीत मात्र आपण कसे प्रतिगामी वागत आहोत?

आजच्या युगात आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डॉक्टरकडे जाणे, वेगवेगळे उपचार करून घेणे, नाही होत तर ‘आयवीएफ’ करणे, तरी होत नसेल तर ‘दत्तक घेणे’. दत्तक हा खरे तर उत्तम पर्याय आहेत. कुणा अनाथ बाळाला आपण आपल्या ओटीत घेतले तर त्याला आई-वडील भेटतात अन् त्याच्यामुळे आपल्याला मातृत्व अन् पितृत्व प्राप्त होते. समाजात अनेक अशी दाम्पत्ये आहेत ज्यांनी हा पर्याय निवडलेला आहे. काही दाम्पत्ये आपण मूल जन्मास घालण्यास सक्षम असूनही मुद्दाम हा पर्याय निवडतात, कारण त्यांना एका अभागी जीवाला जीव लावायचा असतो. न की या दाम्पत्यासारखा  एका निष्पाप जीवाचा जीव घ्यायचा असतो. 

एका लहान मुलीने जिने अजून हे जग नीट बघितले पण नव्हते, तिला संपवणे यांना कसे जमले? आपल्याकडे रोज येणारी, आपल्याच शेजारची, वडिलांचे छत्र नसलेली, अशी सगळ्या बाजूने आपली असलेली पोर, तिला पाण्यात दाबताना यांचे हात कसे कंप पावले नाहीत? माणसाचा मूळ स्वभाव हा प्रेमाचा आहे. प्रेमाची परंपरा आपल्या समाजात एवढी दृढ असताना अधून मधून ही हिंसा येते कुठून, कळत नाही. माणूस आपले माणूसपण विसरत चाललेला आहे. 

आपल्या शिक्षणात जाणीवपर्वक कार्यकारणभाव समजून घेणे आणि आपल्या जडणघडणीत वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारणे फार महत्वाचे आहे. ते एका रात्रीत होणार नाही, पण जागृती करणे गरजेचे आहे. शिवाय अशी कृत्ये करणाऱ्याला व ती करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोघांनाही कडक शिक्षा लवकरात लवकर करणे क्रमप्राप्त आहे.


- नमन सावंत (धावस्कर)  

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या व साहित्यिक आहेत.)