कुडचडे, फोंडा भागात सर्वाधिक घटनांचा समावेश
पणजी : राज्यात समुद्र, नदी, तलाव किंवा अन्य पाणथळ ठिकाणी बुडून मरण्याचे प्रमाण वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात १ जानेवारी ते १५ मार्च दरम्यान १९ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये आत्महत्या केलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. या दरम्यान कुडचडे आणि फोंडा येथून सर्वाधिक ४, तर म्हापसा, मडगाव आणि वाळपई येथून प्रत्येकी ३ कॉल आले होते. वरील कालावधीत अग्निशामक दलाने बुडणाऱ्या २ व्यक्तींना वाचवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरील कालावधीत अग्निशामक दलाला आगीचे वगळता आपत्कालीन घटनांचे ३० कॉल आले होते. यामध्ये १९ जणांचा बुडून मृत्यू झाला तसेच या दरम्यान पाण्यात पडलेल्या २ जनावरांना वाचवण्यात देखील दलाला यश आले आहे. दलाला आलेल्या एकूण कॉलपैकी डिचोली, कुंडई, जुने गोवा, पणजी आणि पेडणे येथे प्रत्येकी २ घटनांची नोंद झाली आहे. तर हडफडे, काणकोण, चिंचणी, गिरी, मोपा, रेवोडा, ताळगाव, वाळपई येथून प्रत्येकी एक कॉल आला होता.
यंदा राज्यात उष्णता अधिक आहे. फेब्रुवारीच्या अखेरपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. हवामान खात्याने मार्च महिन्याचे पहिले १५ दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. विशेष करून उन्हाळा सुरू झाला की विविध पाणथळ ठिकाणी पोहायला जाणाऱ्या लोकांची संख्या वाढते. मात्र, पुरेशी काळजी न घेतल्याने बुडून मृत्यू होतो. सध्या काही समुद्र किनाऱ्यासह निवडक पाणथळ ठिकाणी जीवरक्षक आहेत. या ठिकाणी बुडण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र, अन्य जागांवर बुडण्याच्या घटना घडत आहेत.
गतवर्षी ९२ जणांचा बुडून मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये राज्यात विविध आपत्कालीन परिस्थितीत ११४ जणांना मृत्यू आला होता. यातील ९२ म्हणजेच ८०.७० टक्के मृत्यू हे बुडून झाले होते. गतवर्षी फेब्रुवारी ते मे या उन्हाळी महिन्यात पोहायला गेलेल्या २७ जणांचा बुडून मृत्यू झाला होता.