‘गोवा ऑनलाईन’ सुविधा लवकरच व्हॉट्सअॅपवर

२४१ सरकारी सुविधांचा होणार लाभ : डिजिटल प्रशासनावर भर देण्यास सरकार वचनबद्ध : मंत्री खंवटे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
‘गोवा ऑनलाईन’ सुविधा लवकरच व्हॉट्सअॅपवर

पणजी : माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार खात्यातर्फे गोवा ऑनलाईन सेवा व्हॉट्सअॅपला जोडली जाणार आहे. त्यामुळे आता सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी गोवा ऑनलाईन या वेबसाईटवर अवलंबून राहण्याची गरज नाही. येणाऱ्या काळात घरी बसूनच व्हॉट्सअॅपवर कोणती सरकारी सेवा हवी आहे ते सांगितल्यानंतर काही वेळातच सदर सेवा तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचणार आहे. सरकारी कागदपत्रे, प्रमाणपत्रे, बिले, पेमेंट रिसीट आणि सूचना ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.      

गोवा ऑनलाईनही सरकारी सुविधा २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली रोहन खंवटे यांनी सुरू केली होती. या सुविधेमुळे सर्व लोकांना सरकारी सेवांचा लाभ ऑनलाईन घेणे शक्य झाले होते. आता नवीन एआय प्लॅटफॉर्मच्या मदतीने ही सेवा आणखी सुरळीत होणार असून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लोकांना २४१ सरकारी सुविधांचा लाभ घेता येणार आहे.            

याप्रसंगी बोलताना आयटी मंत्री रोहन खंवटे म्हणाले, राज्य सरकार डिजिटल प्रशासनावर भर देण्यास वचनबद्ध आहे. आम्ही गोवा ऑनलाईनला व्हॉट्सअॅपशी जोडून सरकारी सेवा अधिक कार्यक्षम आणि सुलभ पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत आहोत. पूर्वी सरकारी सेवा घेण्यासाठी थेट त्या त्या खात्यात जावे लागत असे. त्यानंतर ती सेवा रूपांतरित करून  प्रथम गोवा ऑनलाईन ही वेबसाईट सुरू केली. त्यानंतर ग्रामीण मित्र या माध्यमातून कधीही लोकांच्या घरापर्यंत सदर सेवा पोहोचवण्याचा पुढाकार घेतला आणि आता व्हॉट्सअॅपद्वारे आम्ही लोकांना त्यांच्या सोयीनुसार सेवा देऊ इच्छितो.             

गोवा ऑनलाईन व्हॉट्सअॅप सेवेचे मुख्य उद्दिष्ट प्रशासनाला खऱ्या अर्थाने जन-केंद्रित आणि सुलभ बनवणे हे आहे. कीवर्ड आधारित प्रणाली सुरू करून लोकांना चांगल्या सुविधा शोधण्यास मदत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या उपक्रमांमुळे व्हॉट्सअॅपद्वारे लोकांना अर्जाची स्थिती, अंतिम मुदत जवळ येत असताना आठवण करून देणे, तसेच सरकारी २४१ सेवांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि मार्गदर्शन मिळणार आहे.

घरबसल्या मिळणार सेवा

* ऑनलाईन असलेल्या सर्व सरकारी सेवा व्हॉट्सअॅपवर येणार. यासाठी सरकार व्हॉट्सअॅप नंबर जारी करेल.             

* व्हॉट्सअॅपवर फक्त सेवेचे नाव पाठवा, वेबसाईटला भेट देण्याची गरज नाही.            

* व्हॉट्सअॅपवर मार्गदर्शन केले जाईल आणि कागदपत्रे अपलोड केली जातील.       

* सर्व कागदपत्रांची प्रक्रिया वेबसाईटवर हाताळली जाईल, परंतु ही सेवा व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे.      

* ही संकल्पना आंध्र प्रदेश सरकारच्या ‘मन मित्र’ उपक्रमावर आधारित आहे.