सडा येथील गोवा पुनर्वसन मंडळाच्या वसाहतीमधील घटना
वास्को : दुचाकीवरून झालेल्या वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना सडा येथील गोवा पुनर्वसन मंडळाच्या वसाहतीमध्ये गुरुवारी (दि. १३) रात्री घडली. या प्रकरणी मुरगाव पोलिसांनी आरोपी मल्लिकार्जुन बसवराज घिवारी (४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. होळीच्या रात्री ही घटना घडल्याने संपूर्ण वसाहतीमध्ये शोककळा पसरली आहे.
सडा येथील गोवा पुनर्वसन मंडळाच्या वसाहतीला जीआरबी कॉलनी म्हणून ओळखले जाते. येथे घिवारी कुटुंब राहत असून, कुटुंबात आई-वडील, मोठा भाऊ श्रीकांत (५०), मधला मल्लिकार्जुन (४५) आणि धाकटा महेश हे तिघे भाऊ आहेत. श्रीकांत हा जीवरक्षक (लाइफगार्ड) म्हणून कार्यरत होता, तर मल्लिकार्जुन सुरक्षारक्षक व वाहनचालक म्हणून विविध ठिकाणी काम करायचा. धाकटा महेश पेंटर म्हणून काम करतो.
श्रीकांतकडे दुचाकी होती, जी तो न विचारता मल्लिकार्जुन अनेकदा वापरत असे. यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असत. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मल्लिकार्जुनने पुन्हा श्रीकांतच्या परवानगीशिवाय दुचाकी नेली होती. घरी परतल्यानंतर श्रीकांतने त्याला जाब विचारला, त्यामुळे त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यावर रागाच्या भरात मल्लिकार्जुनने घरातील चाकू उचलून श्रीकांतवर वार केले.
या भांडणामुळे वसाहतीतील नागरिक जमले आणि त्यांनी तत्काळ मुरगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. जखमी श्रीकांतला तातडीने चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला.
मल्लिकार्जुन घिवारी पोलिसांच्या ताब्यात
या घटनेनंतर मुरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि आरोपी मल्लिकार्जुन घिवारी याला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक धीरज देवीदास यांच्या नेतृत्वाखाली, पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.