आता कॅन्सरवर शोधणार आयुर्वेदिक-अॅलोपॅथीची मात्रा!

तज्ज्ञांच्या समितीद्वारे संशोधन; मुख्यमंत्र्यांची ‘टाटा’सोबत ‘व्हीसी’

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th March, 11:08 pm
आता कॅन्सरवर शोधणार आयुर्वेदिक-अॅलोपॅथीची मात्रा!

पणजी : कॅन्सरच्या रुग्णांसाठी स्वस्त आणि प्रभावी उपचार देण्याच्या उद्देशाने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गोव्यात कॅन्सरवर उपचार करण्यासाठी अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा एकत्रित वापर करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी संशोधन आणि एसओपी तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


कॅन्सरवर आयुर्वेदिक आणि अॅलोपॅथिक उपचार कसे वापरले जाऊ शकतात यावर टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक उपचारांची संयुक्तपद्धत कॅन्सरवर प्रभावीपणे वापरता येईल का, यावर विचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल (मुंबई) सोबत चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत गोव्यातील अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक डॉक्टर उपस्थित होते. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. राजेश दीक्षित, डॉ. पंकज चतुर्वेदी आणि इतर डॉक्टर, तसेच गोव्यातील डॉ. शेखर साळकर, आयुर्वेदिक संशोधन संस्थेच्या सुजाता कदम, डॉ. मोहन जोशी आणि डॉ. स्नेहा भागवत यांनी चर्चा केली.आयुर्वेदिक उपचारांवर निष्कर्ष काढणे अजून बाकी आहे आणि रुग्णांच्या अनुभवावर आधारित डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे. आयुर्वेदिक संशोधन संस्था (धारगळ), गोमंत आयुर्वेद महाविद्यालय (शिरोडा), आरोग्य विभाग आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल एकत्र येऊन उपचारांसाठी एक एसओपी तयार करतील. जर या उपचार पद्धती अॅलोपॅथीपेक्षा स्वस्त ठरल्या, तर त्यांचा वापर करण्यास काहीही हरकत नाही. आयुर्वेदिक आणि अॅलोपॅथिक डॉक्टरांनी यावर आपले विचार मांडले आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासाठी निर्देश दिले आहेत.