पाच संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद
मडगाव : चिंचणी येथील आधीच विक्री करण्यात आलेल्या प्लॉटची पुन्हा विक्री करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी तक्रारदार अब्दुल गफूर अहमद शेख यांना बनावट कागदपत्रे दाखवून ६२.६४ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी पाच संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल गफूर अहमद शेख (रा. शिरवडे, मडगाव) यांनी फातोर्डा पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, संशयित मारिया दे फातिमा व्हॅलेंटाइन डिसा रेईस फर्नांडिस, रोमल वेलिंगटन दोस रेईस फर्नांडिस, टिना दोस रेईस फर्नांडिस, रुबेन शिगेल तेओदोरिन्हा दोस रेईस फर्नांडिस (सर्व रा. चिंचणी) आणि यासिन उर्फ नबील ईस्माईल शा (रा. मुगाळी, सां जुझे दी अरियाल) यांनी मिळून आर्थिक फसवणूक केली.
संशयितांनी चिंचणी येथील ९२० चौमी जमीन आपली असल्याचे सांगून तक्रारदाराकडून ६२ लाख ६४ हजार ६०० रुपये घेतले. तक्रारदाराला त्यांनी खोट्या पॉवर ऑफ अॅटर्नीचे कागदपत्रे दाखवली, आणि जमिनीची विक्री करण्याचे आश्वासन दिले. तक्रारदाराला मडगाव येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सदर जमीन २०२३ मध्ये दुसऱ्या एका व्यक्तीला विकली गेली होती. तक्रारीनुसार फातोर्डा पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.