फेरबदलावेळी केंद्रीय नेत्यांचा असेल ‘सोशल इंजिनिअरिंग’वर भर
पणजी : विद्यमान मंत्रिमंडळातून तीन निष्क्रिय मंत्र्यांना डावलून त्यांच्याजागी इतर तीन आमदारांना संधी देण्याचा विचार भाजपकडून सुरू आहे. मंत्रिमंडळ फेरबदलावेळी ‘सोशल इंजिनिअरिंग’वर अधिक भर देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश भाजपमधील सूत्रांनी शनिवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची प्रक्रिया केंद्रीय नेतृत्वाने काही महिन्यांपासून सुरू केली होती. त्यासंदर्भात दिल्लीतून एक पथकही गोव्यात पाठवण्यात आले होते. या पथकाने काही मंत्री, भाजप आमदारांच्या मतदारसंघांचा दौरा करून, तेथील स्थानिकांशी चर्चा करून तसेच प्रदेश भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी बैठका घेऊन मंत्री, आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. या पथकाने आगामी काळातील जिल्हा पंचायत तसेच विधानसभा निवडणुकीत कोणकोणत्या समुदायांकडून भाजपला अधिक मते मिळू शकतात, याचा अंदाज घेत तसा अहवाल पक्ष नेतृत्वाला सादर केलेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील फेरबदलावेळी केंद्रीय नेत्यांचा ‘सोशल इंजिनिअरिंग’वर अधिक भर असेल. या पथकाने सादर केलेल्या अहवालावर कोणत्या तीन आमदारांना मंत्री म्हणून संधी द्यायची आणि कोणाला मंत्रिमंडळातून वगळायचे, याचा निर्णय होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
फेरबदलात दामूंची भूमिकाही ठरणार महत्त्वपूर्ण!
१. २०२७ मधील विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असलेली जिल्हा पंचायत निवडणूक या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. त्यानंतर अवघ्या पंधरा महिन्यांनंतर विधानसभा निवडणूक होईल. त्यामुळे प्रदेश भाजपने आतापासूनच दोन्हीही निवडणुकांची जय्यत तयारी सुरू केली आहे.
२. प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच दामू नाईक यांनी कामाची गती आणखी वाढवली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आपल्या कार्यकाळातील सर्व निवडणुका भाजपला जिंकून दिलेल्या आहेत. त्यांनी घातलेला पायंडा पुढील काळात तसाच सुरू ठेवणे आणि भाजपला सलग चौथ्यांदा राज्याची सत्ता मिळवून देण्याचे मोठे आव्हान नाईक यांच्यासमोर असल्याने दोन्ही निवडणुका गांभीर्याने घेत त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यावर भर दिला आहे.
३. गत विधानसभा निवडणुकीत भाजपला ज्या मतदारसंघांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला, त्या मतदारसंघांवर दामू नाईक यांच्यासह पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघांतील मतदारांच्या सतत संपर्कात राहून त्यांच्यापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना पोहोचवणे आणि पक्षाकडे त्यांना आकर्षित करण्याचे स्पष्ट निर्देश दामू नाईक यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
४. मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर अवलंबून असला, तरी पक्ष संघटन म्हणून दामू नाईक यांचीही यात महत्त्वपूर्ण जबाबदारी असणार आहे. त्यामुळेच बी. एल. संतोष यांनीही त्यांच्याकडून मंत्री, आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे.