मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार
पणजी : मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आहे. तेच याबाबतचा निर्णय घेतील असे म्हणत, अहंकारी मंत्र्यांसंदर्भात आपण मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी चर्चा केली असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलावर पुढील पंधरा दिवसांत शिक्कामोर्तब होईल. आमदार नीलेश काब्राल, दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, डिलायला लोबो आणि मायकल लोबो यांच्या नावांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो, असे सभापती तवडकर यांनी शुक्रवारी काणकोणमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. शनिवारी सांताक्रूज येथे आलेल्या तवडकरांना पत्रकारांनी याच विषयावरून घेरण्याचा प्रयत्न केला असता, मंत्रिमंडळ फेरबदल हा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे. कोणाला मंत्रिमंडळात ठेवायचे आणि कोणाला बाहेर काढायचे तसेच फेरबदल कधी करायचा, हे मुख्यमंत्रीच ठरवतील, असे तवडकर म्हणाले.
शुक्रवारी याबाबत बोलताना तुम्ही काही आमदारांची नावे घेतलेली होती. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो का, असे पत्रकारांनी विचारले असता, मी ज्यांची नावे घेतली त्यांची नावे मीडियात वारंवार झळकत असतात. त्यामुळेच त्यांच्या नावांचा विचार होऊ शकतो, असे आपण म्हटल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सहा मंत्री अहंकारी झाल्याचे सांगत त्यांना मंत्रिमंडळातून वगळले पाहिजे, असे वक्तव्य तवडकर यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता, अहंकारी मंत्र्यांसंदर्भात आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केलेली आहे. कोणकोणत्या मंत्र्यांना अहंकार चढला आहे, हे सर्वांनाच माहिती आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मंत्र्यांत खळबळ; इच्छुकांच्या आशा पल्लवीत
राज्य मंत्रिमंडळात पुढील पंधरा दिवसांत फेरबदल होणार, असे वक्तव्य सभापती तवडकर यांनी केल्यानंतर मंत्र्यांमध्ये खळबळ माजलेली आहे. तर, गेल्या अडीच वर्षांपासून मंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या काही आमदारांच्या आशा मात्र पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही आपण मंत्री, आमदारांचे प्रगतीपुस्तक भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांना सादर केलेले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदल कधीही होऊ शकतो, असे स्पष्ट केल्याने फेरबदलाच्या शक्यता वाढल्या आहेत.