धुळवडीनंतर नदीतील आंघोळ युवकासाठी ठरली अखेरची

शेळवण येथील नदीपात्रात बुडून मृत्यू

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
धुळवडीनंतर नदीतील आंघोळ युवकासाठी ठरली अखेरची

कुडचडे : धुळवडीच्या रंगांत रंगल्यानंतर नदीवर कुटुंबीयांसह आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शेळवण येथे घडली. विनय देसाई (४३) असे या युवकाचे नाव आहे.      

शुक्रवारी दिवसभर रंगांत रंगल्याने सर्व जण आंघोळीसाठी सायंकाळी शेळवण (असोल्डा-केपे) येथील नदीवर गेले होते. आधी आंघोळ करावी आणि नंतर सर्वांनी नदीकाठी बसून भोजन करण्याचा बेत आखला होता. इतर आंघोळ उरकून झाल्यावर नदीतून बाहेर आले. ते जेवण तयार करण्याच्या गडबडीत होते, तर विनय हा पाण्यातच होता. काही वेळाने तो पाण्यात दिसेनासा झाल्याचे लक्षात येताच सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. कुटुंबीयांनी लगेच स्थानिक माजी पंच मनोजकुमार नाईक यांच्याशी  संपर्क साधला. त्यानंतर स्थानिकांनी शोधाशोध सुरू केली. पण विनयचा  थांगपत्ता लागत नसल्यामुळे कुडचडे पोलीस आणि अग्निशामक दलाला कळविण्यात आले. त्यानंतर नदीपात्रात शोध घेण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशामक दलाच्या जवानांनी बोटीतून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. शनिवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केल्यानंतर सहा तासांच्या प्रयत्नांती दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला.

दोन मुले पोरकी

विनय देसाई हा प्लंबर म्हणून काम कर असे. त्याला दोन मुले आहेत. त्याच्या अकाली निधनामुळे देसाई कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे.