शेअर बाजारात घसरण : चार महिन्यात १६०० कोटी घटले
पिनाक कल्लोळी
पणजी : पैसे गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा पर्याय लोकप्रिय झाला आहे. असे असले तरी गेले काही महिने शेअर बाजारात होणारी घसरण व अन्य विविध कारणांमुळे मागील चार महिन्यांत गोवेकरांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीत घट झाली आहे. ऑक्टोबर २०२४ अखेरपर्यंत गोव्यातून म्युच्युअल फंडमध्ये ३७ हजार ९०० कोटी रुपये गुंतवण्यात आले होते. फेब्रुवारी २०२५ अखेरीस त्यात १६०० कोटी रुपयांची घट होऊन ते ३६ हजार ३०० कोटी रुपये झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस् इन इंडिया (एएमएफआय) या संस्थेच्या अहवालानुसार ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, गोव्यातील म्युच्युअल फंडमधील प्रति व्यक्ती गुंतवणूक देखील कमी झाली आहे. ऑक्टोबर २०२४ अखेरीस गोव्यात प्रति व्यक्ती २ लाख ४३ हजार ८० रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्यात आले होते. फेब्रुवारी २०२५ अखेरीस त्यात घट होऊन ती प्रति व्यक्ती २ लाख ३३ हजार ९० रुपये झाली आहे. असे असले तरी गोव्यातील प्रति व्यक्ती गुंतवणूक ही देशात सर्वाधिक आहे. या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. येथून प्रति व्यक्ती २ लाख २१ हजार ५६० रुपये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले आहेत. केंद्र शासित प्रदेशांचा विचार करता दिल्ली येथील प्रती व्यक्ती म्युच्युअल गुंतवणूक सर्वाधिक म्हणजेच २ लाख ७२ हजार १५० रुपये इतकी आहे.
अहवालानुसार, फेब्रुवारी २०२५ अखेर पर्यंतच्या आकडेवारीनुसार गोव्यातील एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक ७२ टक्के म्हणजेच २६ हजार ३३८ कोटी रुपये एक्विटी स्कीममध्ये गुंतवण्यात आले आहेत. ४ हजार ६९५ कोटी डेबिट ओरियेंटेड स्कीममध्ये, १ हजार ४०४ कोटी लिक्वीड स्कीममध्ये तर सुमारे ५ हजार कोटी रुपये अन्य स्किममध्ये गुंतवले आहेत. संपूर्ण देशाचा विचार करता फेब्रुवारी २०२५ अखेरीस म्युच्युअल फंडमध्ये सुमारे ६७.५८ लाख कोटी रुपये गुंतवण्यात आले आहेत.
गुंतवणूकदारांची संख्या वाढली
राज्यात म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत घट झाली असली तरी गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या अहवालानुसार ऑक्टोबर २०२४ अखेरीस गोव्यातील २.३३ लाख लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. फेब्रुवारी २०२५ ती वाढून २.४६ लाख झाली आहे. फेब्रुवारी २०२५ अखेरीस गोव्यातील एकूण गुंतवणूकदारांपैकी ३२.३ टक्के महिला होत्या.