केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : देशभरात उभारणार ३५ पार्क
पणजी : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून राज्याची राजधानी असलेल्या पणजीतही मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. मंत्रालयाने पुढील काळात देशभरात ३५ मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेत, त्यासाठी जागाही निश्चित केलेल्या आहेत. यात पणजीचाही समावेश आहे.
राज्यसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तराला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. पणजीसह दिल्ली, मुंबई, उत्तर गुजरात, दक्षिण पंजाब, जयपूर, बंगळुरु, पुणे, विजयवाडा, चेन्नई, नागपूर, इंदूर, पटना, कोलकाता, आंबाला, कोईम्बतूर, जगतसिंगापूर, नाशिक, गुवाहाटी, कोटा, हिसार, विशाखापट्टणम, भोपाळ, सुंदरगड, भटिंडा, सोलन, राजकोट, रायपूर, जम्मू, कोचिन आदी ठिकाणीही केंद्राकडून मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी म्हटले आहे.
मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क म्हणजे काय?
रस्ता, रेल्वे, हवाई आणि जलमार्ग अशा वेगवेगळ्या वाहतूक पद्धती एकाच ठिकाणी वापरून मालवाहतूक आणि इतर लॉजिस्टिक क्रिया सहज करता येतील अशी योजना.
पार्कमध्ये रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गांसारख्या विविध वाहतूक मार्गांसाठी कनेक्टिव्हिटी असते. त्यामुळे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सोपे होते. या कनेक्टिव्हिटीमुळे वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होतो. शिवाय संपूर्ण लॉजिस्टिक्स प्रक्रिया अधिक कार्यक्षम होते.
या पार्कमध्ये माल उतरवणे, साठवणे, वर्गीकरण करणे आणि पुन्हा पाठवणे यांसारख्या लॉजिस्टिक क्रिया सोप्या होतात.
पार्कमध्ये अबकारी, कंटेनर डेपो, ट्रक पार्किंग, ओपन स्टोरेज यार्ड, पेट्रोल पंप, इलेक्ट्रीक वाहनांची चार्जिंग स्टेशन्स, रेस्टॉरन्ट, हॉटेल्स, धाबे तसेच कौशल्य विकास केंद्राचीही स्थापना केली जाते.