घरणीबाईला आंब्याच्या फळाचा दुवाळा लागतो खरा पण सर्वसामान्य माणसाची आंब्याचं फळ विकत घेण्याची ऐपत नसते. मात्र तिचा बाप दूर देशी पिकलेल्या आंब्याच्या बेशी म्हणजेच शिऱ्या आपल्या दुवाळा लागलेल्या लेकीसाठी घेऊन येतो.
आज घरणीबाई नोकरी करणारी, उद्योजिका या रूपात आपल्याला दिसत असली, तरी पूर्वी आपली घरणीबाई ही चूल आणि मूल सांभाळणारी होती. घरातल्या लहानग्यावर संस्कार आणि वडीलधाऱ्यांची सेवा हेच तिचे परम कर्तव्य असायचे. आजच्यासारखे स्त्री स्वातंत्र्य, महिला दिन याचा आणि तिचा काहीही संबंध नसायचा. आपले वडील सांगतात त्याच्या गळ्यात माळ घालून त्याच्याशी सुखाने संसार करणे हेच तिचे ध्येय असायचे. मात्र आपल्या पोटी कृष्णासारख्या सुकुमाराने जन्म घ्यावा असे मात्र तिला नक्की वाटायचे. म्हणूनच आपल्या गरोदरपणात ती स्वतःला बाळकृष्णाची आई देवकीच्या रूपात बघताना गाऊ लागते...
कलमाच्या झाडापोना
कोण गे नार उभी
वलेल्या केसाची
भरलेल्या अंगाची
देवकी नार उभी
कलमाचे झाड हे बहुतांश सत्तरी येथील लोकांचे कुळ होय. अत्यंत पवित्र अशा या झाडाच्या फांदीशिवाय त्या कुळातील परिवारात कोणतेही शुभकार्य होणे अशक्यप्राय. अशा अत्यंत पवित्र झाडाखाली ओले केस पाठीवर सोडून आणि अंगावर बाळसं असलेली घरणीबाई उभी असताना ती देवकीसारखी शोभत आहे. ह्या अशा अवस्थेत देवकी तिथे का बरं उभी असेल? ह्याचा अंदाज लावत घरणीबाई म्हणते...
देवकी न्हाणा आला
आळवा तुझ्या पाना
देवकीचा न्हाणा
ऋतुमती झाल्यानंतर देवकी आपली पहिली आंघोळ अळूच्या पानाचा आडस घेऊन करते. असे सांगणारी वरील ओळ पूर्वी सामान्य माणसांकडे आजच्यासारखे कदाचित स्नानघर नसल्या कारणाने रुंद अशा अळूच्या पानाचा आडोस घेत स्त्रिया आंघोळ करत असल्याचेही अधोरेखित करते.
देवकीचे अळूव्याच्या पानाआड पहिले स्नान झाले आणि त्यानंतर लवकरच देवकीला दिवस गेले. देवकीची म्हणजेच घरणीबाईची पुढची तारीख मागे निघून गेली. दरम्यान देवकी आपली आंघोळ होऊन किती दिवस झाले हे मोजायलाच विसरते आणि तिला जाणीव झाली की ती आता भरल्या अंगाची म्हणजेच गरोदर आहे. त्यामुळेच तिने बाळसं धरलेले आहे आणि अशी ती कलमाच्या झाडाखाली उभी आहे.
कालांतराने गरोदर असल्यामुळे देवकीला दुवाळे (डोहाळे) लागले. ही घरणीबाई आजच्यासारखी उंबरठ्याच्या बाहेर पडलेली नव्हती. तिचे घर आणि परसदार हेच तिचे जग होते. आपल्या परसदारातील झाडे झुडुपे पाहून तिला स्वत:ला लागलेले दुवाळे आठवू लागलात. परसदारी बहरलेला शेगूल म्हणजे गोव्यातील खेडोपाडची आवडती भाजी. पावसाळ्यात कोवळ्या पानांची भाजी करणे, हिवाळ्याच्या दिवसात त्याच्या फुलांची भाजी करणे आणि शेंगा लागतात त्या शेंगाचा वेगवेगळ्या तऱ्हेच्या कालवणात वापर करणे आणि त्या शेंगा आवडीने खाणे ही प्रत्येक गोमंतकीय माणसाची हौस. त्यामुळे प्रत्येकाच्या परसदारी हा शेगुल असायचा. ह्या शेंगाच्या बहरलेल्या झाडाला पाहून घरणीबाई म्हणते...
शेगावला तुज्यो साली
देवकी करी माली
देवकी करी माली
दिस मेजुक इसरली
देवकी दुवाळो
अन्नाचो वकार
पानाचं पेटारो
वासुदेव आणि पुरविलो
दुवाळा लागलेल्या देवकीला अन्न बघताच वांत्या होतात. मात्र पानाचा पेटारा बघताच ती आपला दुवाळा विसरते आणि म्हणून तिचा प्रेमळ वसुदेवासारखा नवरा तिच्यासाठी खायच्या पानांचा पेटारा घेऊन येतो.
देवकीला दुवाळा आंब्याचा लागतो हे सांगताना घरणीबाई गाते...
देवकी दुवाळो
आंब्याची बेशी
आंबा पिकला दूर देशी
माहेराच्या येशी
आंब्याचे शिरे
बाप्पांनी पुरविले
घरणीबाईला आंब्याच्या फळाचा दुवाळा लागतो खरा पण सर्वसामान्य माणसाची आंब्याचं फळ विकत घेण्याची ऐपत नसते. मात्र तिचा बाप दूर देशी पिकलेल्या आंब्याच्या बेशी म्हणजेच शिऱ्या आपल्या दुवाळा लागलेल्या लेकीसाठी घेऊन येतो. तिचा गरीब बाप आपल्या लेकीसाठी आंब्याचे फळ आणताना त्यासाठी त्याला किती काटकसर करावी लागली असेल याचीही घरणीबाईला पूर्णत: कल्पना असते त्यामुळेच आंब्याचे मुळातच गोड असलेले फळ तिला अमृताहुनी गोड लागते. आपला बाप गरीब जरी असला, तरी आपल्या लेकीचा श्रीमंत दुवाळा आपल्या बापाने पुरवला याचे तिला समाधान असते.
याच शेगलाला ती पुन्हा बघून म्हणते...
देवकी दुवाळा
शेगला तुझ्या फुला
देवकीच्या मुला
शेगावला तुझे संगे
देवकीचे वेंगे
कृष्ण बाळ गे सोबले
असे म्हणता म्हणता देवकीचा दुवाळा शेंगदाण्याच्या शेंगेवर येऊन थांबतो आणि पुढे आपल्या पोटी कृष्ण बाळासारखा गोंडस पुत्र जन्म दे अशी प्रार्थना आपल्या परसदाराच्या देवत्व लाभलेल्या झाडाझुडपांकडे ती करते.
कल्पना करा, सुंदर नऊवारी नेसलेली गर्भारपण असलेली कोवळी नार आई होण्याच्या उंबरठ्यावर असते त्यावेळी तिचे सौंदर्य हे स्वर्गातल्या अप्सरेला लाजवेल एवढे उजळ झालेले असते. तसेच प्रत्यक्ष देवीलाही लोभ होईल एवढी सात्त्विकता तिच्या अंगी आलेली असते. भरल्या अंगामुळे लाभलेले सौंदर्य आणि सात्त्विकता यामुळे तिच्या आजूबाजूला एक वेगळीच आभा तयार झालेली असते. घरणीबाईची ही आभा तिचे घर, तिचे परसदार आणि पुढे तिचा संसारही तेजोमय करणारी असते कारण याच तिच्या तेजातून पुढे तिच्या वेलीवरचे पुत्ररुपी किंवा पुत्रीरुपी फुल उमलणार असते. स्त्रीच्या आयुष्याची ही एवढी सुंदर अवस्था घरणीबाई अगदी सहजपणे आपल्या ओव्या मधून गाऊ लागते...
कलमाच्या झाडापोना
कोण गे नार उभी
वलेल्या केसाची
भरलेल्या अंगाची
देवकी नार उभी
गाैतमी चाेर्लेकर गावस