मुख्यमंत्र्यांचे निर्देश; अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने चर्चा
बैठकीत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा, लाडली लक्ष्मी, गृहआधार, कलाकार पेन्शन आदी सामाजिक योजनांचे प्रलंबित रकमेचे वितरण आधार प्रणालीचा वापर करून लवकरात लवकर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिले.
येत्या २४ मार्चपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आणि २६ मार्च रोजी मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सोमवारी मंत्रालयात मुख्य सचिव, इतर खात्यांचे सचिव, दोन्ही जिल्हाधिकारी तसेच खातेप्रमुखांसोबत बैठक घेतली. त्यात विविध सामाजिक योजनांच्या प्रलंबित रकमेचे लवकर वितरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यात पारदर्शकता येण्यासाठी आधारबेस पद्धतीने प्रलंबित रकमेचे वितरण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, बैठकीत २४-२५ च्या अर्थसंकल्पीय वापराचा तसेच राज्यात राबविल्या जात असलेल्या केंद्र पुरस्कृत योजना आणि नवीन केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात प्रलंबित बाबींची पूर्तता करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिले. लोकांच्या सूचना विचारात घेऊन राज्याचा दीर्घकालीन विकास साधणारा अर्थसंकल्प यंदा सादर केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले.