आसगाव येथील २०१८ मधील प्रकरण : सायकल-कार अपघातात युवक झाला होता ठार
पणजी : आसगाव येथे २०१८ मध्ये सायकल आणि सुमो जीप यांच्यात अपघात झाला होता. यात सायकलस्वार उमाकांत पँगिंग (१८, आसाम) या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता. त्याच्या वडील आणि भाऊला ६ जानेवारी २०२३ पासून ७ टक्के व्याजदरासह १७ लाख ८४ हजार २०० रुपयांची भरपाई द्या, असा आदेश पणजी येथील उत्तर गोवा मोटार अपघात दावा लवादाचे अध्यक्ष क्षमा जोशी यांनी दिला आहे.
या प्रकरणी उमाकांत पँगिंग याचे वडील इतिराम पँगिंग आणि भाऊ लोहीत पँगिंग यांनी अपघात दावा लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यांनी कारचालक मिंगेल डिसोझा व मालकीण प्रिस्का डिसोझा आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांना प्रतिवादी केले होते. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, २ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ८.३० वाजता मयत उमाकांत पँगिंग सायकलने आसगावहून म्हापसाला जात होता. याच दरम्यान खोर्ले-शिमेर राष्ट्रोळी देवस्थानजवळ पोहचताच समोरून येणाऱ्या सुमो जीपने आपली दिशा सोडून सायकलस्वार उमाकांत पँगिंग याला धडक दिली. त्यात पँगिंग गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असताना त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला होता. त्यानंतर पोलिसांनी सुमो जीप चालक मिंगेल डिसोझा याच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. या प्रकरणी उमाकांत पँगिंगच्या कुटुंबियांनी गोवा मोटार अपघात दावा लवादाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. न्यायालयात पँगिंग याच्या कुटुंबियांतर्फे अॅड. पी. सुतार यांनी बाजू मांडली.
७ टक्के व्याजासह भरपाई देण्याचे आदेश
कारचालकाच्या वकिलांनी सायकलस्वाराच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा दावा केला. कार चालकाकडे अपघातावेळी वाहन परवाना नव्हता. त्याने विमा नियमाचे उल्लंघन केल्याचा दावा विमा कंपनीने केला. सर्वांची बाजू एेकून लवादाने उमाकांत पँगिंग याचे वडील आणि भावाला ६ जानेवारी २०२३ पासून ७ टक्के व्याजदरासह १७ लाख ८४ हजार २०० रुपयांची भरपाई देण्याचे आदेश जारी केले. संबंधित रक्कम विमा कंपनीला लवादाच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले आहे.