भारतीय न्याय संहितेनुसारही भोंदूवर करता येते कारवाई
पणजी : अंधश्रद्धेच्या प्रकारांना मूठमाती देण्यासाठी राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हवाच. सध्या भारतीय न्याय संहितेमध्ये अशा प्रकारांबाबत कारवाईचे अधिकार आहेत. पण, त्यासाठी नागरिकांनी पोलीस स्थानकांमध्ये तक्रारी देणे गरजेचे आहे. सोबतच पोलिसांनीही अधिकारांचा वापर करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकवणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक आहे, असे मत निवृत्त पोलीस अधिकारी सी. एल. पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यातील विविध पोलीस स्थानकांमध्ये उपनिरीक्षक, निरीक्षक या पदांवर काम करीत असताना आपण भोंदूगिरी करणाऱ्या सुमारे २०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांचा भांडाफोड केलेला होता. पणजी, म्हापसा, मडगाव, फोंडा परिसरातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये थांबून अनेक भोंदू लोकांची आर्थिकदृष्ट्या फसवणूक करीत होते. त्यांच्याबाबतची माहिती मिळताच आपण तत्काळ तेथे जाऊन त्यांना अटक केली होती. आताही विविध राज्यांतून गोव्यात येऊन तसेच काही स्थानिकही देवाधर्माच्या नावाखाली लोकांची लूट करीत आहेत. भारतीय न्याय संहितेतील एका कलमाद्वारे अशा भोंदूंवर पोलिसांना कारवाई करता येते. परंतु, त्यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर तक्रारी करणे आवश्यक आहे, असे पाटील म्हणाले.
राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केल्यास भोंदूंवरील कारवाईला आणखी गती मिळण्यास मदत होईल. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अशिक्षित शिक्षितांची करतात फसवणूक
बेती येथील एका विधवा महिलेला एक भोंदू वारंवार फसवत होता. त्याबाबतची तक्रार तिच्याकडून आल्यानंतर आपण संबंधित भोंदूला ताब्यात घेतले. त्याला पणजी पोलीस स्थानकात आणताना त्याच्याकडे लॅपटॉप असल्याचे आढळून आले. आपण त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता, ‘आपण अशिक्षित आहे. परंतु, लॅपटॉपवरील एक बटण दाबले की एक कुंडली दिसते. तीच कुंडली आपण सर्वांना दाखवतो’ असे उत्तर त्याच्याकडून मिळाले. यावरून अशिक्षित भोंदू शिक्षितांना कशाप्रकारे फसवतात हे समोर आल्याची आठवणही सी. एल. पाटील यांनी सांगितली.
पाटोवरील भोंदूचा केला होता भांडाफोड
काही वर्षांपूर्वी पाटो-पणजी येथेही एका भोंदूने आपले दुकान थाटलेले होते. त्याला भेटण्यासाठी रांगा लागत होत्या. या प्रकाराची स्वेच्छा दखल घेऊन त्याला पडकण्यासाठी आपण तेथे गेलो, तेव्हा त्या रांगेत गोवा विद्यापीठातील एक प्राध्यापक उभा असलेला दिसला. आपली काही कामे पूर्ण होत नसल्यामुळे आपण त्याच्याकडे आल्याचे त्या प्राध्यापकाने आपल्याला सांगितले. त्यानंतर आपण त्या भोंदूला बाहेर आणून तो लोकांची कशाप्रकारे फसवणूक करतो, हे दाखवून दिले होते, असेही सी. एल. पाटील यांनी सांगितले.