घाडी, मांत्रिकांवर कारवाईसाठी राज्यात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा हवाच!

रमेश गावस : अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार राज्यात आजही सुरूच

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th March, 12:14 am
घाडी, मांत्रिकांवर कारवाईसाठी राज्यात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा हवाच!

पणजी : जादूटोण्यासारखे प्रकार रोखण्यासाठी आणि घाडी, मांत्रिकांवर वचक बसवण्यासाठी राज्यात अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे कार्यकर्ते रमेश गावस यांनी रविवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
गोव्याला सुशिक्षित, प्रगतीशील राज्य म्हटले जात असले, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अनेक घटना राज्याच्या कानाकोपऱ्यांत घडत असतात. घाडी किंवा मांत्रिक सर्वसामान्य जनतेला जादूटोण्यासारख्या प्रकारांकडे आकर्षित करून अंधश्रद्धा वाढीस लावत आहेत. असे प्रकार केवळ अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याद्वारेच रोखता येऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर राज्यात अशा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. त्यामुळे जादूटोण्याच्या भूलथापा करून जनतेला लुटणाऱ्या आणि त्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या मांत्रिकांवर जरब बसवणे शक्य होईल. राज्यात सध्या अशाप्रकारचा कायदाच अस्तित्त्वात नसल्यामुळे घाडी किंवा मांत्रिक अशा प्रकारांना अधिकाधिक चालना देत आहेत आणि सर्वसामान्य जनता त्यांच्या भूलथापांना फसत आहे, असे गावस यांनी नमूद केले.
काही परप्रांतीयांकडून अंधश्रद्धेच्या प्रकारांना चालना
गेल्या काही वर्षांपासून राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची संख्या वाढत आहे. यातील काही परप्रांतीय आपल्यासोबत येताना आपापल्या राज्यातील जादूटोण्यासारख्ये प्रकारही घेऊन येत असून, भोळ्या जनतेला त्यात अडकवू पाहत आहेत. त्यांच्यामुळे गोव्यातील अंधश्रद्धा वाढत असून, त्यातील विचित्र प्रकारही घडत आहेत. असे प्रकार तत्काळ रोखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याची गरज असल्याचे रमेश गावस म्हणाले.
कौल घेणे हीसुद्धा अंधश्रद्धाच!
राज्यातील काही भागांतील जनताही अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकली आहे. लग्न, मूल होण्यासाठी, अडचणींतून बाहेर पडण्यासाठी आजही अनेकजण मंदिरात जाऊन कौल घेतात. विवाहासाठी शुभ दिवस, शुभ वेळ ठरवण्यासाठी कौल घेतात, या सर्व अंधश्रद्धेच्याच गोष्टी आहेत असे म्हणत, विवाहाचा दिवस आणि वेळ ठरवणारी व्यक्ती सरकारी नोकरी मिळाल्यानंतर सेवेत दाखल होण्यासाठी मात्र कौल का घेत नाही, असा सवालही रमेश गावस यांनी उपस्थित केला.
काही वर्षांपूर्वी डिचोलीत घडला होता प्रकार
काही वर्षांपूर्वी डिचोलीमध्ये एका घाडीकडून अंधश्रद्धेचा भयानक प्रकार घडला होता. एका महिलेला भूतबाधा झाली म्हणून या घाडीकडे आणण्यात आले होते. संबंधित घाडीने भूत उतरवण्यासाठी त्या महिलेला जबर मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. परंतु, हे प्रकरण पद्धतशीरपणे मिटवण्यात आले. त्यानंतर संबंधित घाडीने घाडीपणा करणे सोडून दिले, अशी आठवणही रमेश गावस यांनी सांगितली.
साप चावल्यानंतर आजही होतो मांत्रिकाचा वापर
राज्यातील अनेक भागांमध्ये आजही साप चावल्यानंतर संबंधित व्यक्तीला मंदिरात ठेवले जाते, तीर्थ पाजले जाते, मांत्रिकाकडे नेले जाते. परंतु, त्याला चावलेला साप विषारी असल्यास या सर्वांचा काहीही परिणाम होत नाही. अशावेळी संबंधित व्यक्तीला इस्पितळात नेऊन तत्काळ उपचार करणेच योग्य असते. परंतु, काही नागरिकांच्या मनात अंधश्रद्धेचे भूत अजूनही कायम असल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत, असेही रमेश गावस यांनी सांगितले.