अगदी सोप्पा फर्स्ट एड किट

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
09th March, 03:26 am
अगदी सोप्पा  फर्स्ट एड किट

आपल्याला काही लागलं, खरचटलं, पडून एखादा भाग दुखायला लागला की डॉक्टरकडे जाण्यापूर्वी आपल्याला लगेच उपयोगी पडते ते म्हणजे  फर्स्ट एड किट म्हणजेच प्रथमोपचाराचा डबा. त्यात बऱ्याचदा अनेक औषधं असतात ज्यांची कधी कधी आपल्याला नावंही वाचता येत नाहीत. मग त्यासाठी तुम्ही तुम्हाला समजेल असा पण अतिशय उपयुक्त असा प्रथमोपचाराचा डबा तयार करू शकता.

त्यासाठी फक्त ४ घटक लागतील. आणि हे ४ घटक तुमच्या घरात असतातंच... जरा डोकं खाजवा आणि यापैकी एखादा घटक तुम्ही सांगू शकता का बघा... यातील १ - २ घटक तर तुम्ही कधी न कधीतरी प्रथमोपचारासाठी नक्की वापरले असतील. 

हे ४ घटक आहेत तीळ तेल, खोबरेल तेल, साजूक तूप आणि मध. आपल्या आयुर्वेदात तर या घटकांना श्रेष्ठ औषधं असं म्हटलं आहे बरं का! अनेक आजारांमध्ये आपण आपली युक्ती वापरून हे घटक उपयोगात आणू शकतो. 

आता यांचे उपयोग आपण बघू. 

तीळ तेल

हे तेल तीळांपासून काढले जाते. थंडीच्या दिवसात व पावसाळ्यात हे तेल वापरावे.
हातपाय दुखत असतील तर लगेच तीळ तेल वाटीत घेऊन गरम करावे आणि दुखणाऱ्या भागावर मालिश करावी.    नाक चोंदलं असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर लगेच तीळ तेलात करंगळी बुडवून तेल नाकाला आतून लावावे. असे दिवसातून ३- ४ वेळा केले असता, नाकाने सहज श्वास घेता येतो.    पायांना भेगा पडायला सुरुवात झाली असेल तर लगेच या तेलाने तळपायांना मालिश करावी. खोबरेल तेल  पडून खरचटलं असता त्या ठिकाणी थोडीशी हळद खोबरेल तेलात घालून लावावी.    रोज सकाळी शी होत नसेल, शीच्या जागी दुखत असेल तर एक छोटा चमचाभर खोबरेल तेल रात्री झोपताना प्यावे. शी करताना तो भाग दुखत असेल किंवा शी करताना जोर द्यावा लागत असेल तर खोबरेल तेलात कापसाचा बोळा भिजवून तो शीच्या जागी रात्री ठेवावा. सकाळी काढून टाकावा. असे केल्याने शी करताना त्रास होत नाही. 

पोटात दुखत असेल तर गरम खोबरेल तेलात १-२ लसूण पाकळ्या किंवा चिमूटभर हिंग किंवा कापूर घालून ते तेल पोटाला चोळावे.   उन्हातून येऊन डोकं दुखत असल्यास डोक्यावर खोबरेल तेलाची धार सोडून चंपी करावी.

साजूक तूप

तोंड आले असता म्हणजेच तोंडात जखम झाली असता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तिथे साजूक तूप लावलं असेलंच. तूप लावलं की तोंडातल्या जखमा लगेच भरून येतात. 

ओठ फाटले असता, ओठांची साल निघत असेल तर रोज ओठांना साजूक तूप लावावे. 

कुठेही चुरचुरत असेल तर त्याठिकाणी तूप चोळावे.  खूप मोठ्याने रडून, ओरडून घसा दुखत असेल तर चमचाभर तूप  आणि खडीसाखर चघळून खावी. 

मध

 सर्दी झाली असताना तुमच्यापैकी काही जणांना तुमच्या वैद्यांनी मधातून चाटण दिलं असेल ना?  मध कफ कमी करणारा आहे म्हणून याचा वापर सर्दी, खोकल्याच्या औषधांमध्ये केला जातो.  खोकला येत असेल तर चिमूटभर मिरीपूड किंवा हळद चमचाभर मधात कालवून चाटण करावे. याने खोकला कमी होतो.    न भरून येणाऱ्या काही जखमांवर मधाची पट्टी ठेवली असता जखम लवकर भरून येते.  तेल, तूप व मध असे वेगवेगळ्या आजारांमध्ये वापरता येऊ शकतात. चला मग कामाला लागा. छानसा डबा घेऊन त्यात एक छोटीसी तीळ तेलाची बाटली, एक खोबरेल तेलाची बाटली, एक साजूक तुपाची डबी, एक मधाची डबी छान लेबल लावून ठेवा. आणि गरज लागली की या तुम्ही तयार केलेल्या फर्स्ट एड किट चा वापर करा.


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य