मोठ्या कंपनीत काम करणारे अथर्वचे बाबा मिटींगसाठी बाहेरगावी गेले होते व शाळेत शिक्षिका असलेली अथर्वची आई शाळेतल्या मुलांना पिकनिकसाठी पाच दिवस अभयारण्यात घेऊन गेली होती. म्हणून सुनीलकाकासोबत अथर्व पमामावशीकडे रहायला आला होता.
पमामावशीही अथर्वला त्याच्या आवडीचं सारं करून घालत होती. सुनीलकाकासोबत अथर्वला बुद्धीबळ खेळायला आवडे. पमामावशीची सासू म्हणजे जीजीआज्जी, अथर्व व श्रेयसला खूप साऱ्या गोष्टी सांगे. महिन्याभरापासून जीजीआज्जीला संधिवातामुळे काहीच घरकाम जमत नव्हतं त्यामुळे घरातली सगळी कामं पमामावशीलाच करावी लागत.
अथर्वची आज्जी गावी रहात होती. इथे अथर्व नि आईबाबा. अथर्वच्या आईला कमी का कामं आसायची! पण अथर्वच्या घरची पद्धत जरा वेगळी होती. अथर्वकडे अथर्वचे बाबाही बरीच कामं करायचे. कुकर लावायचे, कोशिंबीर करायचे, भाजी घेऊन यायचे. अथर्वही कपड्यांच्या घड्या करी, इस्त्रीला नेऊन देई. घर नीटनेटकं केलं, प्रत्येक वस्तू जागेवर ठेवली की आई त्याला दोन रुपयाचं नाणं देई, जे तो त्याच्या पिगीबँकमध्ये टाके. जवळजवळ अर्धीतरी भरत आली होती पिगीबँक. आईसोबत जाऊन तो ते पैसे बँकेत ठेवणार होता.
एकदा अथर्व श्रेयससोबत मैदानावर खेळायला गेला. अर्धातास खेळल्यावर त्याला कंटाळा आला म्हणून तो बेसमेंटमध्ये जाऊन बसला. तिथे खालच्या मजल्यावरच्या परीने आपली चुळबोळकी मांडली होती. अथर्वने तिला विचारलं, “मी येऊ का गं तुमच्यात खेळायला?” परी म्हणाली, “हो ये की. जा आपल्या बाळांना शाळेत सोडून ये. येताना भाजी आण हो.”
अथर्वला मोठी गंमत वाटली. परीच्या सांगण्याप्रमाणे तो कामं करत होता. अगदी ताटवाट्या पुसून घेणंही केलं त्याने. धाटूमाटूची जेवणं आवरली तसा परीला म्हणाला, “परीदी, जेवण झक्कास झालं होतं. आता तू जरा टिव्ही बघत बस. मी भांडी घासून घेतो, ओटा आवरतो.” परी खूश झाली.
इकडे क्रिकेट खेळून आलेले श्रेयस व त्याचे मित्र अथर्वचा खेळ पाहून खो खो हसू लागले. अथर्व रडवेला झाला. परीने त्या मुलांना सज्जड दम भरला. तरी घरी येताच श्रेयसने आई व आज्जीला अथर्व परीदीसोबत भातुकली खेळल्याचं सांगितलं. पमामावशीने अथर्वकडे लटक्या रागाने बघितलं व म्हणाली, “असले बायकी खेळ आपण खेळू नये अथर्व.”
दुसऱ्या दिवशी सकाळी पमामावशी उठलीच नव्हती. तिचं अंग चांगलंच तापलं होतं. सुनिलकाकाला तर चहासुद्धा जमत नव्हता. अथर्वने सुनीलकाकाला मदत करायचं ठरवलं. एक कप चहाला किती चमचे साखर, चहापावडर लागते ते सांगितलं. सुनिलकाका तसं करू लागला. आज प्रथमच त्याने सर्वांसाठी चहा केला.
दुपारच्या जेवणातही वरणभाताचा कुकर कसा लावायचा हे अथर्वने काकाला शिकवलं. साधीसोप्पी बटाट्याची भाजी करायलाही मदत केली. श्रेयसही त्यांच्यासोबत छोटीमोठी कामं करू लागला. मशीनला लावलेले कपडे वाळत घालू लागला, केर काढू लागला. जेवून गोळ्या घेतल्यावर पमामावशीला खरंच बरं वाटलं. तिचा ताप उतरला. तापामुळे आलेल्या अशक्तपणामुळे संध्याकाळी काही करण्याचं त्राण मात्र तिच्यात नव्हतं.
अथर्वने काकाला कणिक तिंबून दिली. काकाने वेगवेगळे नकाशे बनवले खरे. अथर्वने कुळथाचं पिठलं कसं करायचं ते दाखवलं. अथर्व, अवघा चौथीतला पोर पण निरीक्षणातून त्याने स्वयंपाककला अवगत केली होती. मस्त जेवणं झाली. फ्रुट सॅलडही केलं. पमामावशीने अथर्वला जवळ घेतलं, म्हणाली, “अथर्वबाळा, मी काल दुपारी तुला भातुकली खेळण्यावरून बोलले पण ते किती चुकीचं बोलले ते मला आता कळालं रे. मी तुझ्या सुनिलकाकाला, श्रेयसलाही स्वयंपाकाची कामं कधी करू दिली नाहीत आणि एका अर्थाने त्यांना अपंग केलं बघ. आता मात्र मी ठरवलंय, या दोघांनाही घरकाम करताना सोबत घ्यायचं. म्हणजे मी आजारी पडले की ते दीनवाणे होणार नाहीत.”
श्रेयसलाही आईचं म्हणणं पटलं. त्याने भातुकलीच्या खेळावरनं अथर्वची खिल्ली उडवली होती त्याबद्दल तो खजिल झाला.
बोध : तर बालमित्रांनो, या कथेतून आपण शिकलो की कोणतंही काम हे लहान नसतं. घरकाम हे प्रत्येकाला आलं पाहिजे. स्वयंपाक ही एक कला आहे, ती स्त्रीपुरुष दोघांनाही यायला हवी कारण पोट तर प्रत्येकाला असतं आणि ते भरण्यासाठी चवीढवीचा स्वयंपाक स्वतःला करता येणं गरजेचं आहे.
गीता गरुड