चुकीची जाणीव

Story: छान छान गोष्ट |
02nd March, 04:39 am
चुकीची जाणीव

पावसाळ्याचे दिवस होते. तपस्या व विन्मयी मैत्रिणी होत्या. दोघीही अगदी लहान होत्या. त्या शाळेत जात. इयत्ता पहिलीत शिकत. शाळा सुटल्यावर एक दिवस त्या खेळत असताना त्या दोघींना त्यांची शाळेची बस चुकली. खेळून संपल्यावर त्यांच्या लक्षात आले. त्यांनी इकडे पाहिले, तिकडे पाहिले तर कुणीच दिसेना. मग तपस्या म्हणाली, “अगं विन्मयी आता आपल्याला गाडी चुकली!!” हे ऐकून विन्मयीला रडूच आले. मग तपस्या म्हणाली, “अगं बाई आता रडू नकोस.” 

विन्मयी म्हणाली, “रडू नको तर काय करू?” तपस्या म्हणाली, “मला एक युक्ती सुचली आहे. आपण काय करुया, आपण चालत जाऊयात.”   हे ऐकून विन्मयी थक्क झाली. ती म्हणाली, “नको गं बाई!!! रस्त्यावर गाड्या असतात खूप. मला भीती वाटते.” तपस्या म्हणाली, “घाबरू नकोस, मी आहे ना!” झालं, मग विन्मयी तपस्यासोबत चालत जायला तयार झाली.

त्या रस्त्यावर एकमेकींचा हात धरून चालू लागल्या. गाड्या आल्या की दोघीही पळत सुटायच्या. रस्ता क्रॉस करताना तर दोघींना काही कळेच ना कधी पुढे जायचे आणि कधी मागे यायचे, कधी थांबायचे. चालता चालता त्यांना भूक लागली. विन्मयी म्हणाली, “तपस्या मला भूक लागली आहे.” तपस्याने काही पैसे आणले होते. त्यांनी काही चिप्स व गारेगार ऊसाचा रस घेतला. त्यांनी तिकडेच रस्त्याच्या कडेला बसून चिप्स खाल्ले, थंड थंड रस पिला. त्यांना जरा बरे वाटले. 

त्या परत जाऊ लागल्या. जाता जाता विन्मयीच्या पायात गोळे आले. तपस्याला तर चालता पण येईना झाले. 

कसेतरी पाय ओढत ओढत दमून भागून दोघीही घरी पोहोचल्या. घरी तोपर्यंत कुणाला काहीच माहीत नव्हते. बस येऊन गेली तरी मुली आल्याच नाहीत म्हणून सगळे काळजीत होते. आजीने तर कुणाकुणाला फोन केले. या दोघींचा काहीच पत्ता नाही म्हणून घरचे सगळे घाबरून गेले. विन्मयीचे बाबा तिला कुठे कुठे शोधून आले. 

तपस्या आपल्या घरी पोहोचली. तिची आज्जी दारातच वाट पाहत उभी होती. तिने धावत जाऊन आपल्या आज्जीला मिठी मारली व म्हणाली, “आजी बघ गं, माझं पोट कसं आत गेलंय. माझे पाय पण दुखतायत. बस चुकली म्हणून आम्ही चालत चालत आलो...”

एवढ्यात तिची आईही तिथे आली. तिला म्हणाली, “तपू, तू कधीही चालत येऊ नको. रस्त्यावर चालायचे काही नियम असतात. तुम्ही दोघी अजून लहान आहात. वाटेत गाड्या असतात, चोर, गुंड असतात. तुम्हाला माहीत नाही काय काय वाईट वाईट घडतंय हल्ली... त्यामुळे तुम्ही दोघींनी आपापल्या आई बाबांचा फोन नंबर पाठ करा. तू माझा आणि बाबांचा नंबर पाठ करून ठेव. जर अशी बस चुकली तर शाळेत बाईंना तरी सांगत जा. बाई आम्हाला फोन करतील. कुणी सोबत मोठी माणसे असल्याशिवाय असे चालत येऊ नका.” 

तपस्याने आपल्या आईला मिठी मारली आणि वचन दिले की ती कधीच यापुढे कुणी मोठी माणसं सोबत असल्याशिवाय अशी एकटी चालत येणार नाही.  


अनया विठ्ठल गावस

इयत्ता : तिसरी
शाळा : डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, वाळपई