तिच्या अस्वस्थ मनाची अवस्था तिने सुमीला फोनवर कळवली. सुमी तिला समजावत होती, उपदेशही करत होती, धीर देत होती आणि ती मनाने किती मजबूत आहे तेही पटवून देत होती. कधी पत्रातून, तर कधी संवादातून.
नववर्ष सुरू होऊन जानेवारी संपत आला तरी मनू ते पत्र कितीतरी वेळा वाचत होती. तिच्या मैत्रिणीने म्हणजे सुमीने वर्षाच्या अखेरी ते पत्र तिच्यासाठी लिहिले होते. मोबाईलवर छान टाईप केले होते. तिला पत्राद्वारे छान उपदेश केला होता. सोबत दोन छानशा बालपणीच्या आठवणीही लिहिल्या होत्या. तिने लिहिलेली पहिली आठवण... ‘दोघीही बालपणी बिंबलीच्या झाडावर बसून कच्चे पेरू खायचे’ आणि दुसरी आठवण म्हणजे ‘दोघीही न घाबरता कुशावतीच्या भरल्या पात्रात कळशी उपडी टाकून पोहायला जायच्या. कदाचित कळशी घसरली तर बुडण्याचा संभव होता पण दोघी कधीच घाबरत नव्हत्या...’
हे पत्र वाचताना मनुच्या नयनातून अश्रू ओघळू लागले. ते आनंदाचे होते की दुःखाचे हे तिलाच कळेना... तिच्याजवळ बसलेला बोनुला मात्र तिच्या मनभावना समजल्या. त्यांने कुकू आवाज करीत तिच्या पायाजवळ रेंगाळायला सुरुवात केली. मागील एक महिन्यापासून मनुच्या मनाची अवस्था भावूक होती. ती विचित्र मानसिक अवस्थेतून जात असल्याचे प्रत्येक दिवशी सुमिला फोनवर सांगत होती. सुमी तिला मायेने उपदेश करत होती. समजावतही होती. तिच्या मनांची घालमेल फक्त सुमीलाच समजत होती... तिच्या संसारात आलेल्या वादळामुळे मनू पार घाबरली होती. सुमी म्हणजे तिची बाल मैत्रीण दोघीही एकाच वयातील. अगदी निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या.
मनू लग्न होऊन सासरी गेली आणि सुमी आपले शिक्षण पूर्ण करून चांगली आर्टिस्ट चित्रकार झाली. त्यानंतर सुमीचे लग्न झाले आणि ती मुंबईला गेली. सुमी खूप हुशार, फायनआर्टमध्ये टॉप रँकर त्यामुळे मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. सुमीने मुंबईत एका खोलीत संसार मांडला व काही दिवसातच स्वकष्टावर एका चांगल्या वस्तीत ती ‘थ्री बीएचके’ मोठा फ्लॅट घेतला. गृहप्रवेशाला मनुला आग्रह करून बोलावून, तिला चार-पाच दिवस अख्खी मुंबई फिरवून दाखवली. मनुला खूप आनंद झाला आणि आश्चर्यही. खेड्यात वाढलेली सुमी लग्नानंतर मुंबईत जाऊन इतकी स्मार्ट बनली की अख्खी मुंबई ती एकटी फिरत होती. कधी गोव्याला आली तर मनूकडे चार-पाच दिवस राहायची. जोपर्यंत दोघांची मुले लहान होती तोपर्यंत दोघींची एकमेकींकडे सुट्टीच्या दिवसात ये-जा चालूच होती.
हळूहळू मुले मोठी होऊ लागली. दोघी आपापल्या मुलांच्या शिक्षणात व्यस्त झाल्या. त्यामुळे दोघींचे एकमेकींकडे सहजासहजी जाणे खूप कमी झाले. तरी आठवड्यातून दोघींचे एकमेकांकडे फोनवर बोलणे व्हायचे. दोघींनाही एकमेकांच्या जीवनात येणाऱ्या चढउतारांची परिपूर्ण माहिती होती. वेळ मिळेल तशा दोघी एकमेकींकडे तासनतास बोलायच्या.
मनुची कन्या लग्न होऊन अमेरिकेत सेटल झाली आणि काही काळाने तिच्या मुलाला बेंगलोरसारख्या मोठ्या शहरात मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. मुलगा आठवड्यातून एकदा घरी यायचा. आई-बाबांसोबत चांगला वेळ घालवायचा. त्यामुळे मनू खूप खूश होती पण त्याच्या लग्नानंतर तो हळूहळू बेंगलोरमध्ये सेटल झाला. त्यामुळे हळूहळू मनुच्या मुलांचे आपल्या गावी येणे, आपल्या घरी येऊन राहणे कमी कमी होऊ लागले. मुलगा त्यांना बेंगलोरला येऊन राहा म्हणून सांगत होता पण मनू आणि तिचे मिस्टर जायला तयार नव्हते.
हळूहळू मनुचेही वय वाढू लागले होते. काही काळाने मनुचे मिस्टरही निवृत्ती झाले आणि त्याला करमेनासे झाले. एकदम एकटेपणाची भावना त्यांना जाणवू लागली. त्यात मुलेही दूर त्यामुळे ते अस्वस्थ होऊ लागले. मनुचेही आता वय झाले होते. हल्ली तिची तब्येतही नाजूक होत होती. त्यामुळे तिच्या मिस्टरांनी वृद्धाश्रमात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. वृद्धांच्या सहवास लाभेल, तसेच आपली काळजी घेणारे कुणीतरी असेल असे तिच्या पतीराजांचे ठाम मत झाले परंतु मनू मात्र या गोष्टीला तयार नव्हती. मिस्टर तिला हात पाय धडधाकट असताना वृध्दाश्रमात जाऊन राहूया म्हणून सुचवत होते. त्यामुळे दोघांमध्ये खडके उडू लागले. इतका काळ उभयतांनी एकमेकांच्या संगतीने अगदी आनंदाने, एकमेकाला सुखदुःखाच्या क्षणी साथ देत घालवले होते. आताही मनुला आपल्या मिस्टरांसोबत आपले घर, बागबगीचा सोडून जायचे नव्हते आणि तिचे मिस्टर आपण स्वखुशीने धडधाकट असताना वृध्दाश्रमांत जाऊन राहूया म्हणत होते. पण तिचे मन काही तयार होत नव्हते.
तिच्या अस्वस्थ मनाची अवस्था तिने सुमिला फोनवर कळवली. सुमी तिला समजावत होती, उपदेशही करत होती, धिर देत होती आणि ती मनाने किती मजबूत आहे तेही पटवून देत होती. कधी पत्रातून, तर कधी संवादातून. सतत एक महिना तिला मोबाईलवर पत्रे लिहीत होती. त्या पत्रांमध्ये कितीतरी बालपणीच्या आठवणी होत्या आणि सुमी आणि मनुने जीवनात केलेल्या धाडसाच्या कहाण्या होत्या. दोघी न घाबरणाऱ्या, कोणत्याही परिस्थितीत स्वतःला एडजस्ट करत पुढे जाणाऱ्या हे त्या पत्रातून सुमी तिला समजत होती. तिच्या पत्रांनी मनुच्या मनाचा धीर वाढला. ती परत एकदा खंबीर झाली.
तिने मिस्टरांना समजावण्याचा ठाम निश्चय केला. तिने सीनियर सिटीजन क्लब, ध्यानधारणा शिबिर, नामस्मरण वर्ग, बुजुर्ग मेळावे ह्या सर्वात त्यांना प्रवेश घ्यायला लागला. त्यांना लायब्ररीमधून पुस्तके वाचायला देऊ लागली त्यामुळे तोही यात रंगू लागला. घरातल्या मोती, मिलीसोबत दोघी खेळण्यात रंगू लागली. तिच्या मनाची जिद्द, जगण्याचा नवीन ऊर्जा तिच्या मैत्रिणीने म्हणजे सुमीने तयार केली होती. मनुचा संसार परत सावरला. तिला जुन्या वर्षाच्या मावळतिला तिने सतत लिहिलेली कितीतरी पत्रे त्यात तिने मनुला समजावले होते. मनू आता सावरली होती. मनुने मनाशी ठरवले की सगळ्यावर माया करायची. हसऱ्या चेहऱ्यावर मुखवटा घालून जीवनात कोणाशी राजकारण खेळायचे नाही. आपण सगळ्यांशी चांगलेच वागायचे आणि वृद्धापकालीन जीवन अगदी आनंदाने, सुख समाधानाने जगायचे. सुमीच्या त्या पत्रांनी तिला जगण्याचे नवीन बळ दिले होते. त्यातील सुमिने वर्षाच्या शेवटी लिहिलेले पत्रं ती आज नवीन वर्षाचा प्रारंभ झाला तरी वाचत होती. एक वेगळ्याच सुख समाधानाने...
शर्मिला प्रभू
आगाळी-फातोर्डा