साहित्य :
पाव किलो खिमा, १ मोठा कांदा बारीक चिरलेला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ.
अख्खा मसाला : १ वेलची, २ ते ३ लवंग, १ चक्री फूल, २ तमालपत्र, ४ ते ५ काळीमिरी.
वाटण : अर्धी खोबऱ्याची भाजलेली वाटी, २ ते ३ पाकळ्या लसूण, २ ते ३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, अर्धा तुकडा आलं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
कृती :
खिमा स्वच्छ धुवून त्यावर ३ ते ४ चमचे मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद टाकून १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा. एका पातेल्यात ३ ते ४ डाव तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतवा त्याचवेळी अख्खा मसालासुद्धा परतवून घ्या. आता सर्व पदार्थ एकत्र करून त्यात अर्धा पेला पाणी टाकून २० ते २५ मिनिटे मंद आचेवर ठेवून द्या (मटणाचा खिमा असल्यामुळे शिजायला वेळ लागतो) भांड्यावर वरून झाकण ठेवून त्यात अर्धा ग्लास पाणी ठेवा.
१५ ते २० मिनिटांनंतर झाकणावरील पाणी गरम झाल्यावर ते आतील खिम्यामध्ये टाकावे याचबरोबर तयार वाटण आणि मीठसुद्धा टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता आच थोडी वाढवून ५ ते १० मिनिटे सतत ढवळत रहा. हळूहळू खिम्यामधील पाणी आटू लागेल. आपल्या आवडीनुसार सुके होईपर्यंत ढवळत राहा आणि गॅस बंद करा. तयार आहे स्वादिष्ट चमचमीत खिमा!
कविता आमोणकर