गर्भावस्था सगळ्यांसाठीच अगदी आनंद आणि उत्साहाचा काळ असतो. पण त्याचसोबत महिलांना यादरम्यान ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. गर्भावस्थेत शारीरिक बदल व सदृढता हे केंद्रस्थानी असले तरी, स्त्रीच्या एकूण गर्भधारणेच्या अनुभवाला आकार देण्यासाठी मानसिक आरोग्य देखील तेवढेच महत्त्वाचे असते.
प्रत्येक १०० गर्भवती महिलांपैकी १० ते १५ महिलांना नैराश्य आणि चिंता प्रभावित करते. प्रसूतीनंतर मानसिक आरोग्य खालावल्यास पोस्टपार्टम डिप्रेशनचा सामना करावा लागू शकतो याबद्दल आपण ऐकले असेलच, पण याचसोबत गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्यासुद्धा आपल्या विचारापेक्षा जास्त सामान्य आहेत. या प्रसूतीपूर्व मानसिक आरोग्याचा जागतिक स्तरावर सुमारे १०% गर्भवती महिलांवर परिणाम होताना दिसून येतो. यामुळे मानसिक आरोग्याचा गर्भावस्थेवर कसा परिणाम होतो हे समजून घेणे गर्भवती आई व विकसनशील बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
गर्भावस्थेचा काळ उत्साह आणि आव्हानांनी भरलेल्या विविध शारीरिक आणि मानसिक घडामोडींचा असतो. या स्थितीतून जात असलेल्या महिलेला आपण गर्भधारणा कसे हाताळू किंवा मातृत्व कसे सांभाळू याबद्दल काळजी होणे तसेच या काळात ताणतणाव किंवा चिंता अनुभवणे स्वाभाविक आहे. पण तो वाढल्यास मानसिक आरोग्य खालावू शकते.
गर्भावस्थेदरम्यान मानसिक आरोग्य खालावण्याची कारणे
काम-नोकरी किंवा इतर जबाबदाऱ्यांसह गर्भधारणेचा समतोल साधण्यास असक्षम होणे
मळमळ, पाठदुखी आणि सूज यासारख्या गर्भधारणेच्या लक्षणांमुळे होणारी शारीरिक अस्वस्थता
गर्भधारणा किंवा प्रसूती दरम्यान त्रास किंवा अतिवेदना होण्याची भिती बाळगणे
आपल्या शरीराची बदलती प्रतिमा व बदलांशी जुळवून घेण्यात असमर्थ असणे
आपले शारीरिक व मानसिक बदल कुटुंबियांसोबत व्यक्त करू न शकणे
एकाकी वाटणे किंवा कुटुंबियांचा पाठिंबा नसणे.
आपल्या आणि बाळाच्या आरोग्याच्या संभाव्य त्रासाबद्दल चिंता करत राहणे
चांगले पालक होण्याची आणि आपल्या मुलाच्या पालनपोषणाची चिंता करणे
या परिस्थितीची तीव्रता वेगवेगळी असू शकते आणि पुढील गोष्टींमुळे ती अजून बिकट होऊ शकते:
हार्मोनल बदल (इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनमधील बदलांमुळे मूड स्विंग, ताण आणि चिंता वाढू शकते)
आधीपासून असलेल्या मानसिक आरोग्याच्या समस्या
जीवनातील तणावपूर्ण घटनांमुळे झालेला पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर
बायपोलर डिसऑर्डर, ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर आणि टोकोफोबिया (प्रसूतीची भीती)
गर्भावस्थेदरम्यान मानसिक आरोग्य खालावल्याची लक्षणे
अचानक मूड स्विंग्स येणे
कंपल्सीव म्हणजे सक्तीचे वर्तन दिसणे
सततची चिंता, छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होणे
पॅनिक अटॅक येणे: यामुळे हृदय धडधडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थरथरणे, थंडी वाजणे
कारणाशिवाय दुःख, निराशा किंवा रडण्याची भावना येणे
निद्रानाश, सतत सुस्ती, थकवा जाणवणे
गोष्टी लक्षात ठेवण्यास व एकाग्रता राखण्यास अडचण येणे
स्वतःला किंवा बाळाला इजा करण्याचे विचार मनात येणे
मानसिक आरोग्याचा बाळाच्या विकासावर परिणाम
नैराश्य आणि चिंतेमुळे गर्भावस्थेत मधुमेह, प्रीक्लेम्पसिया आणि प्रीटर्म जन्म होण्याचा धोका वाढतो. तणावादरम्यान सोडले जाणारे कॉर्टिसॉल हे संप्रेरक सामान्य प्रमाणात गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असते. पण दीर्घकाळ ताणामुळे कॉर्टिसॉल पातळी जास्त प्रमाणात वाढल्यास विकसनशील गर्भाला हानी पोहोचू शकते. यामुळे पेशींच्या संरचनेमध्ये, न्यूरोट्रान्समिशनसह महत्त्वाच्या विकासात्मक प्रक्रियांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. वाढती कॉर्टिसॉलची पातळी प्लेसेंटा ओलांडून गर्भाच्या रक्तप्रवाहात प्रवेश करू शकते व विविध जैविक प्रक्रियांमध्ये बदल झाल्यामुळे बालपणात विकासात्मक समस्या उद्भवू शकतात.
गर्भावस्थेदरम्यान मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देणे
याकाळात उपचार न केलेल्या मानसिक आरोग्याच्या समस्या आई आणि बाळ दोघांवरही गंभीर परिणाम करू शकतात. यामुळे मादक पदार्थांचे सेवन, अयोग्य पोषण आणि इतर हानिकारक वर्तने दिसून येऊ शकतात. गर्भावस्थेदरम्यान मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास पुढील गोष्टींवर ध्यान द्या.
संतुलित आहार घेणे. दारू- तंबाखूचे सेवन न करणे आणि पुरेशी झोप घेणे
आपल्याला आवडणारी कामे करणे. ध्यान किंवा माइंडफुलनेस सारख्या रीलॅक्सेशन पद्धतींचा सराव करणे
कुटुंब आणि मित्रांकडे मदत मागणे व त्यांचा पाठिंबा मिळवणे
आपल्या समस्या दुसऱ्यास सांगून उपचार पर्यायांचा शोध घेणे: थेरपी, औषधोपचार किंवा जीवनशैलीतील बदल आणणे
वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रसूतीपूर्व केले जाणारे व्यायाम शिकून घेणे
लक्षात ठेवा की आपण एकटे नाही आहोत. गर्भावस्थेदरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी अनेक संसाधने आणि आधार उपलब्ध आहेत. निरोगी आणि परिपूर्ण मातृत्व अनुभवासाठी आपल्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर