दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासनाची कारवाई : २०१७ मधील आदेशावर आता अंमलबजावणी
जेसीबीद्वारे कोमुनिदाद जागेवरील अतिक्रमण हटवताना कामगार.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मडगाव ते कोलवा रस्त्यावरील मडगाव कोमुनिदादच्या जागेवर सुमारे वीस वर्षांपासूनची अतिक्रमणे बुधवारी दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकांच्या उपस्थितीत हटवण्यात आली. २०१७ मध्ये आदेश आल्यानंतरही काही हस्तक्षेपांमुळे ही कारवाई रखडली होती. आता प्रशासनाकडून दखल घेत कारवाई करण्यात आल्याची माहिती मडगाव कोमुनिदादचे अध्यक्ष साविओ कुरेय्या यांनी दिली.
मडगावहून कोलवाच्या दिशेने जाणार्या रस्त्याच्या बाजूला मडगाव कोमुनिदादच्या मालकीची जागा आहे. या जागेवर मागील वीस वर्षांपासून बेकायदेशीररीत्या बांधकामे उभारण्यात आली होती. काळानुसार छोट्या-मोठ्या बांधकामांची संख्या वाढत जात ही संख्या सुमारे ३० झाली होती. यात हॉटेल, फर्निचर व भंगारअड्डा यांचा समावेश आहे. मडगाव कोमुनिदादकडून याची यापूर्वीच दखल घेत २०१५ मध्येच ही बांधकामे पाडण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचा आदेश दक्षिण गोवा जिल्हा प्रशासकांकडून २०१७ मध्ये जारी करण्यात आला होता. यानंतरही काही राजकीय हस्तक्षेपामुळे ही कारवाई केली जात नव्हती. आता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढाकार घेत आवश्यक सुविधा, मनुष्यबळ व पोलीस बंदोबस्ताची सोय करण्यात आल्यानंतर दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक गणेश बर्वे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
बेकायदा बांधकामे पाडण्यासाठीचा आदेश २०१७ मध्ये जारी करण्यात आला होता. मात्र, त्याला आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे ही कारवाई रखडली होती. कोमुनिदादच्या जागेवर अतिक्रमण केलेेली सर्व बांधकामे पाडण्यात येतील.
_ गणेश बर्वे, प्रशासक, दक्षिण गोवा कोमुनिदाद
आदेशानंतरही कारवाई आठ वर्षे रखडली
मडगाव कोमुनिदादचे अध्यक्ष साविओ कुरैया यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासूनची कोमुनिदादच्या जागेवरील बांधकामे आता हटवली जात आहेत. यासाठी जिल्हाधिकारी, कोमुनिदाद प्रशासक यांच्या पुढाकारातून ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. २०१५ मध्ये बेकायदा बांधकामे पाडण्याचा निर्णय झाला होता. २०१७ मध्ये त्यासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर सुमारे आठ वर्षे कारवाई झाली नव्हती.