डीडीएसएसवाय : आठ वर्षांत इस्पितळांवर सुमारे ३४२ कोटी खर्च !

सर्वाधिक खर्च गोव्यातील मणिपालवर; आरोग्यमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून स्पष्ट


13th February, 12:03 am
डीडीएसएसवाय : आठ वर्षांत इस्पितळांवर सुमारे ३४२ कोटी खर्च !

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेअंतर्गत (डीडीएसएसवाय) उपचारांसाठी निश्चित केलेल्या गोव्यातील आणि गोव्याबाहेरील ५८ इस्पितळांसाठी सरकारने गेल्या आठ वर्षांत सुमारे ३४२ कोटी रुपये खर्च केले आहेत. यात सर्वाधिक ९२.१६ कोटी रुपये गोव्यातील मणिपाल इस्पितळावर खर्च करण्यात आला आहे.
विधानसभा अधिवेशनात आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सादर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. ‘डीडीएसएसवाय’ योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी सरकारने गोव्यातील ४४ आणि इतर राज्यांतील १४, अशी एकूण ५८ इस्पितळे निश्चित केली आहेत. गेल्या सहा वर्षांत विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या ४३,९९७ गोमंतकीयांनी गोव्यात आणि गोव्याबाहेर जाऊन ‘डीडीएसएसवाय’ योजनेअंतर्गत उपचार घेतले आहेत. गेल्या आठ वर्षांत या इस्पितळांत जाऊन उपचार घेतलेल्यांसाठी सरकारने सुमारे ३४२ कोटी रुपये खर्च केले असून, त्यातील ३३४.७३ कोटी गोव्यातील ४४ इस्पितळांवर, तर ७.१७ कोटी गोव्याबाहेरील इस्पितळांवर खर्च करण्यात आले आहेत. गोव्यातीलही एका मणिपाल इस्पितळावर ९२.१६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, असे उत्तरातील आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येते.
काय आहे ‘डीडीएसएसवाय’?
वैद्यकीय उपचारांसाठी तीन व त्यापेक्षा कमी सदस्य असलेल्या कुटुंबासाठी वार्षिक अडीच लाख, तर चार व त्यापेक्षा जास्त सदस्य असलेल्या कुटुंबांसाठी वार्षिक चार लाखांचा मोफत विमा सरकारकडून देण्यात येतो.
सरकारच्या या योजनेमुळे कॅन्सर तसेच इतर दुर्धर आजारांवरील उपचार घेणे गोमंतकीयांना सोपे होत आहे. सरकारकडून मोफत विमा मिळत असल्याने दरवर्षी राज्यातील हजारो रुग्ण या योजनेअंतर्गत उपचार घेत आहेत.
विविध प्रकारच्या ४४७ आजारांवर योजनेअंतर्गत उपचार केले जातात.
सुरुवातीला योजनेत केवळ गोव्यातील खासगी इस्पितळांचा समावेश केला होता. परंतु, का​ही गोमंतकीय उपचारांसाठी इतरही राज्यांतील खासगी इस्पितळांत जातात. त्यांना तेथे मदत मिळावी​, यासाठी सरकारने इतर राज्यांतील १४ इस्पितळांचा या यादीत समावेश केला.
गेल्या आठ वर्षांत बार्देश आणि सासष्टी या दोन तालुक्यांतील सर्वाधिक रुग्णांनी योजनेचा फायदा घेतला आहे.