बँक खाते-आधार कार्ड लिंक नसल्यामुळे २५ हजार महिला ‘गृह आधार’पासून वंचित

महिला आणि बाल कल्याण खात्याकडून स्पष्ट


12th February, 12:03 am
बँक खाते-आधार कार्ड लिंक नसल्यामुळे २५ हजार महिला ‘गृह आधार’पासून वंचित

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले नसल्यामुळे सुमारे २५ हजार महिला ‘गृह आधार’ योजनेपासून वंचित राहिल्या आहेत. या योजनेच्या लाभार्थींना सरकारने बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे सक्तीचे केले आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झाल्यानंतरच योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण खात्याने दिली आहे.
राज्यात १,४४,१०२ महिला ‘गृह आधार’ योजनेचा लाभ घेतात. सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला जात होता. मात्र १२ डिसेंबर २०२३ रोजी महिला आणि बाल कल्याण खात्याने परिपत्रक काढून योजनेसाठी बँक खाते आधार कार्डला लिंक करणे सक्तीचे केले होते. दिलेल्या वेळेत काही खाती आधार कार्डशी लिंक न झाल्यामुळे या खात्यात पैसे येणे थांबले आहे. १,१८,९५१ महिलांनी त्यांचे खाते आधार कार्डशी लिंक केले असल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत आहे. परंतु २५,१५१ जणांनी खाते आधार कार्डशी लिंक केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे येण्याला अडथळा निर्माण झाला आहे. आधार कार्ड खात्याची लिंक होताच त्यांनाही योजनेचा लाभ मिळणे सुरू होणार आहे. तसेच थकित असलेली रक्कम एकाच वेळी दिली जाणार आहे, असे खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन खात्याला आधार कार्ड लिंक करावे. त्याची प्रत महिला आणि बाल कल्याण तसेच समाज कल्याण खात्याच्या कार्यालयात जमा करावी. त्यानंतर त्यांचे बँक खाते आम्ही अॅक्टिवेट करू आणि गोवा इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड (जीईएल) त्यांच्या खात्यात हे पैसे जमा करेल, असेही खात्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
आधार कार्ड लिंक सक्तीची अट केंद्र सरकारची
एखाद्या लाभार्थ्याची चार बँक खाती असतील तर ती सर्व खाती खाती आधार कार्डशी लिंक असतीलच. परंतु ज्या खात्यात योजनेचे पैसे येतात, त्या बँक खात्यासाठी विशेष प्रक्रिया करावी लागते. या खात्यात योजनेचे पअसे यावेत म्हणून डायरेक्ट बँक ट्रान्सफरसाठी (डीबीटी) आधार लिंक करावे लागते. सरकारी योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँक खाते डीबीटीसाठी आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे आहे. केंद्र सरकारने ही अट घातली आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.