२०२० च्या तुलनेत २०२३ मध्ये पोलिसांच्या संख्येत घट

लोकसभेतील उत्तरातून स्पष्ट : गोव्यातील दर एक लाख लोकसंख्येमागील प्रमाण


12th February, 12:01 am
२०२० च्या तुलनेत २०२३ मध्ये पोलिसांच्या संख्येत घट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यात २०२० ते २०२३ दरम्यान दर एक लाख लोकसंख्येच्या मागे असणाऱ्या पोलिसांच्या संख्येत किरकोळ घट झाली आहे. २०२० मध्ये एक लाख लोकसंख्येमागे ५११.७८ पोलीस होते. २०२३ मध्ये ते कमी होऊन ४९८.४७ झाले. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार माला रॉय यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१९ मध्ये गोव्यात एक लाख लोकसंख्येमागे ३६३.९१ पोलीस होते. २०२० मध्ये ते वाढून ५११.७८ झाले. २०२१ मध्ये ५१८.१४, २०२२ मध्ये ५०५.६३ तर १ जानेवारी २०२३ अखेरीस गोव्यात दर एक लाख लोकसंख्येमागे ४९८.४७ पोलीस होते. यादरम्यान राष्ट्रीय सरासरी २०१९ मध्ये १५८.२२, २०२० मध्ये १५५.७८, २०२१ मध्ये १५२.५१, २०२२ मध्ये १५२.८०, तर २०२३ मध्ये १५४.८४ होती.
१ जानेवारी २०१९ ते १ जानेवारी २०२३ अखेरीस नागालँड येथे दर एक लाख लोकसंख्येच्या मागे सर्वाधिक पोलीस होते. वरील कालावधीत येथे दर एक लाख लोकसंख्येच्या मागे १,१३५ ते १,३२३ पोलीस होते. यानंतर मणिपूर (९४१ ते १,०२३), सिक्कीम (७६५ ते ८३४), त्रिपुरा (५५५ ते ५९१), अरुणाचल प्रदेश (७६६ ते ८६१) या राज्यांचा क्रमांक लागतो. वरील कालावधीत बिहारमध्ये दर एक लाख लोकसंख्येच्या मागे सर्वात कमी पोलीस होते. ही संख्या ६७ ते ८१ इतकी कमी आहे.
बिहारनंतर पश्चिम बंगाल (९७ ते १०१), राजस्थान (११८ ते १२८), ओडिशा (१२० ते १४१), मध्य प्रदेश (१०६ ते १२६), गुजरात (१२२ ते १३१), उत्तर प्रदेश (१२९ ते १३५) या राज्यांचा क्रमांक लागतो. केंद्रशासित प्रदेशात अंदमान आणि निकोबार बेटांवर दर लाख लोकसंख्येमागे ७८३ ते १,०५० पोलीस होते. यानंतर लडाखमध्ये ५६९ ते ८७३ पोलीस होते. तर दादरा आणि नगर हवेलीमध्ये सर्वांत कमी म्हणजे ७० ते १०४ पोलीस असल्याचे उत्तरात म्हटले आहे.


दर १०० पोलिसांमागे ११ वाहने
पोलीस संशोधन आणि विकास ब्यूरो (बीपीआरडी) च्या अहवालानुसार १ जानेवारी २०२३ अखेरीस गोवा पोलीस दलात एकूण ७,८३१ पोलीस होते. पोलिसांना ८८७ वाहने देण्यात आली होती. गोव्यात दर १०० पोलिसांच्या मागे ११.३३ वाहने होती.