राज्यात ९६२ नोंदणीकृत बोअरवेल!

तीन वर्षांत ७८ बेकायदा बोअरवेलवर कारवाई


11th February, 11:56 pm
राज्यात ९६२ नोंदणीकृत बोअरवेल!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : चिंबल येथील ६० ते ७० बोअरवेल अनधिकृत असल्याचे उघड झाल्यानंतर जलस्रोत खात्याने या बोअरवेलच्या मालकांना नो​टिसा जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्यात ९६२ बोअरवेल नोंदणीकृत असून, गेल्या सुमारे तीन वर्षांत ७८ बेकायदेशीर बोअरवेलवर जलस्रोत खात्यामार्फत कारवाई करण्यात आल्याचे राज्य सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
जमिनीखालील पाण्यात वारंवार घट होत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. अशा स्थितीत काहीजण जलस्रोत खात्याची परवानगी न घेताच बेकायदेशीररीत्या बोअरवेल, विहिरी खोदत आहे. त्याचा परिणाम पाण्यावर होत असल्यामुळे जलस्रोत खात्याने अशाप्रकारच्या बेकायदेशीर बोअरवेल, विहिरींच्या मालकांवर कारवाईची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चिंबल भागात बेकायदेशीरपणे खोदण्यात आलेले ६० ते ७० बोअरवेल असल्याची तक्रार प्राप्त होताच खात्याने त्या बोअरवेलच्या मालकांना तत्काळ नोटिसा जारी केल्या आहेत. यापुढे राज्यातील सर्वच भागांमध्ये अशा मोहिमा सुरू करून बेकायदेशीररीत्या खोदण्यात आलेल्या बोअरवेल, विहिरींच्या मालकांना नोटिसा जारी करून, पाच ते दहा लाखांपर्यंतचा दंड त्यांच्याकडून वसूल करण्याचा निर्णयही खात्याने घेतला आहे.

आजपासून पाहणी सुरू
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार, खात्याचे अधिकारी बुधवारपासून राज्यातील विविध भागांमध्ये जाऊन बोअरवेल आणि विहिरींची पाहणी करणार आहेत. जे​ बोअरवेल आणि विहिरी बेकायदेशीर असल्याचे​ उघड होतील, त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खात्याच्या सूत्रांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.