भाई, ताईंनंतर कृषी संरक्षणासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : स्व. जॅक सिक्वेरा यांच्या आग्रहामुळेच गोव्यात जनमत कौल घेण्यात आला. जनमत कौल झाल्याने गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकून राहिले. त्यामुळे मंत्रालय व आम्ही सर्व मंत्री, आमदार होऊ शकलो, असे उद्गार कृषिमंत्री रवी नाईक यांनी काढले. स्व. भाऊसाहेब बांदोडकर, शशिकलाताई काकोडकर यांच्यानंतर गोव्यातील शेतजमिनीचे संरक्षण करण्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मोठे योगदान आहे, असे कौतुकोद्गारही कृषिमंत्र्यांनी काढले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा अमृतकाल कृषी धोरणाचा शुभारंभ झाला. यावेळी कृषिमंत्री बोलत होते. स्व. जॅक सिक्वेरा यांच्यामुळेच गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकून राहिले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. त्यानंतर शशिकलाताई काकोडकर यांनी कूळ आणि मुंडकार कायदा आणला. त्यामुळे कूळ आणि मुंडकारांना शेती कसणे शक्य होत आहे. त्यांच्यानंतर आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कृषी धोरण तयार केले. कृषी जमिनीचे संरक्षण करण्यासह शेतकऱ्यांना सवलती देण्याची तरतूद कृषी धोरणात आहे. या धोरणाचा शेतकऱ्यांना लाभ होईल. शेती वाढण्यासाठीही याची मदत होईल, असेही कृषिमंत्री रवी नाईक यावेळी म्हणाले.