२०२४ मध्ये दोघांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ठोकली धूम

मुख्यमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून स्पष्ट : पाच वर्षांत पळालेले ६ अद्यापही फरार


11th February, 05:28 am
२०२४ मध्ये दोघांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ठोकली धूम

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागील पाच वर्षांत गोवा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन १८ जण पसार झाले. यामध्ये पोलिसांच्या ताब्यात किंवा तुरुंगात असलेल्या तसेच कोलवाळ तुरुंगातील आरोपींचा समावेश आहे. पळून गेलेल्या १८ पैकी १२ जणांना पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले. अद्याप ६ जण मात्र फरारच आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत आमदार विजय सरदेसाई यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, २०२० ते २०२४ या कालावधीत २०२० मध्ये पोलिसांच्या ताब्यातून सर्वाधिक ७ आरोपी फरार झाले होते. यातील ३ जण कोलवाळ तुरुंगातील कैदी होते. या तिघांना पुन्हा पकडण्यात आले. उर्वरित ४ पैकी ३ जणांना पुन्हा पकडण्यात आले. तर एक जण अद्यापही फरारी आहे. २०२३ मध्ये ६ आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेले होते. यातील ३ जणांना पुन्हा अटक करण्यात आली, तर ३ जण अजूनही फरार आहेत.
२०२४ मध्ये दोघे आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. यातील सुलेमान सिद्दिकी याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र म्हापसा डिटेंशन केंद्रातून पळून गेलेला अन्य एक आरोपी अद्यापही पोलिसांना वाकुल्या दाखवत गुंगारा देत आहे. २०२२ मध्ये पळून गेलेल्या दोघांपैकी एका आरोपीला पुन्हा अटक करण्यात आली. तर एका आरोपीला पुन्हा बेड्या ठोकण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. २०२१ मध्ये पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या एका आरोपीला पुन्हा अटक करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.
पंधरा जण निलंबित; एक बडतर्फ
आरोपी पळून गेल्या प्रकरणी मागील पाच वर्षांत विविध विभागांतील १५ पोलिंसाचे निलंबन करण्यात आले असून त्यांची याबाबत खात्याअंतर्गत चौकशी सुरू आहे. एका आयआरबी पोलीस कॉन्स्टेबलला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरातून स्पष्ट केले आहे.