किरकोळ वाद वगळता देवस्थानच्या निवडणुका शांततेत

मये (केळबाय), साळ (भूमिका) देवस्थानांच्या निवडणुका स्थगित : आगरवाडा नागनाथ निवडणुकीवेळी आरोप-प्रत्यारोप


10th February, 12:01 am
किरकोळ वाद वगळता देवस्थानच्या निवडणुका शांततेत

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : काही ठिकाणी झालेली किरकोळ वादावादी वगळता रविवारी राज्यात देवस्थान समितीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. दुपारपर्यंत बहुतेक देवस्थान समित्यांचे पदाधिकारी जाहीर झाले होते. श्री बोडगेश्वर (म्हापसा), श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण आणि श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थानच्या महाजनांची संख्या अधिक असल्याने तेथील निवडणूक प्रक्रिया पूर्ण व्हायला काहीसा विलंब झाला. बार्देश तालुक्यातील बहुताांश देवस्थानांच्या समित्या बिनविरोध निवडून आल्या. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, जांबावली येथील श्री रामनाथ दामोदर देवस्थानची निवडणूक तीन मतपेट्यांद्वारे घेण्यात आली. तिन्ही मतपेट्या सील करण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरच येथील निकाल जाहीर केला जाणार आहे.
देवस्थानांच्या निवडणुका होत असताना वादाचे प्रसंग उद्भवू नयेत, तसेच कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रशासनाने आणि विशेषतः पोलिसांनी काळजी घेतली होती. ज्या देवस्थानांमध्ये कोणताही वाद नाही, तसेच शांततेने मतदान पार पडेल, असा अंदाज होता, त्या देवस्थानांमध्ये कमी प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. मामलेदार, संयुक्त मामलेदार आणि देवस्थानचे प्रशासक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. वादाची शक्यता दिसल्यास तातडीने त्याची माहिती देवस्थानच्या प्रशासकांना देण्याचे आदेश निवडणूक कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. प्रत्येक देवस्थानची निवडणूक प्रक्रिया कशी झाली, या विषयीचा सविस्तर अहवाल अधिकाऱ्यांनी सोमवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला देणे बंधनकारक आहे. देवस्थान निवडणुकांमुळे मामलेदार कार्यालयांचे सर्व कर्मचारी रविवार असूनही कामावर हजर होते.
मये (केळबाय), साळ (भूमिका) देवस्थानांची निवडणूक स्थगित
मये येथील श्री महामाया केळबाय देवस्थानच्या निवडणूक प्रक्रियेवेळी कारबोटकर गटाने हरकत घेतली. निवडणूक बेकायदा असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे निवडणूक स्थगित ठेवण्यात आली. साळ येथील श्री भूमिका देवस्थानच्या काही मतदारांना हरकत घेण्यात आल्याने निवडणूक स्थगित ठेवण्याचा निर्णय मामलेदारांनी घेतला.
वेळूस येथे गुरव समाजाचा बहिष्कार
वेळूस (सत्तरी) येथील श्री रवळनाथ देवस्थानच्या निवडणुकीवर गुरव समाजाने बहिष्कार टाकला. देवस्थानचे कोणतेच अधिकार आम्हाला मिळत नाहीत, असा दावा या गटाने केला. गुरव समाजाने बहिष्कार टाकल्यामुळे गावकर समाजाच्या सदस्यांनी निवडणुकीत बाजी मारली.


आगरवाडा येथे निवडणुकीवेळी आरोप-प्रत्यारोप करताना दोन गटांतील सदस्य.
आगरवाडा येथे वादानंतर एका गटाची माघार
आगरवाडा येथील श्री नागनाथ भूमिका वेताळ देवस्थानच्या निवडणुकीत चार वेळा आरोप-प्रत्यारोप आणि वादावादीचे प्रसंग उद्भवले. मामलेदार कार्यालय पेडणेच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून यावर तोडगा काढण्यात यश मिळवले. त्यानंतर एका गटाने निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक बिनविरोध झाली असली तरी भविष्यात पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अध्यक्षपदी राजेश नागवेकर यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. निवडणूक सकाळी १०.३० वा. सुरू झाली. दुपारी १ पर्यंत आरोप-प्रत्यारोप सुरूच होते. महाजनांमध्ये दोन गट पडले होते. देवस्थानच्या चार मानकऱ्यांपैकी एकाची निवड समितीवर झाली पाहिजे, अशी मागणी करत एका गटाने अध्यक्षपदासाठी अशोक नागवेकर यांचे नाव सुचवले. त्याला हरकत घेण्यात आली. नंतर निवडणूक झाली. चार मानकऱ्यांपैकी एकाची निवड करण्याचा प्रस्ताव फेटाळला गेल्याने एका गटाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या गटाचे सदस्य देवळातून बाहेर पडले. त्यामुळे समितीची निवड बिनविरोध झाली.
जांबावलीत तणाव
जांबावली येथील श्री रामनाथ दामोदर देवस्थानची निवडणूक तणावपूर्ण वातावरणात पार पडली. तीन गटांत विविध प्रकारे मतदान घेण्यात आले. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मूळ यादीतील मतदारांसाठी एक मतपेटी ठेवण्यात आली होती. ज्यांची नावे यादीतून वगळण्यात आली होती, त्यांच्यासाठी स्वतंत्र मतपेटी ठेवण्यात आली होती. ज्या मतदारांची नावे नव्याने यादीत समाविष्ट करण्यात आली होती, त्यांच्यासाठी वेगळी मतपेटी ठेवली होती. मतदानानंतर तिन्ही मतपेट्या सिल करण्यात आल्या. न्यायालयाच्या आदेशानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.

महालक्ष्मी संस्थानच्या अध्यक्षपदी श्रीनिवास धेंपे
पणजी येथील श्री महालक्ष्मी संस्थानच्या अध्यक्षपदी श्रीनिवास धेंपे यांची निवड झाली. महेश कांदोळकर (सचिव), गौरीश धोंड (खजिनदार), नारायण मांद्रेकर (मुखत्यार) हे अन्य पदाधिकारी आहेत.


पांडुरंग देवस्थानच्या अध्यक्षपदी प्रतापसिंग राणे
साखळी येथील श्री पांडुरंग देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांची निवड झाली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (कार्यकारी अध्यक्ष), उदयसिंग राणे (उपाध्यक्ष), दौलतराव राणे (मुखत्यार) आणि धैर्यसिंगराव राणे (खजिनदार) यांची निवड झाली.