दोन जवान हुतात्मा : महाराष्ट्र सीमेवरील राष्ट्रीय उद्यान परिसरात कारवाई
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
रायपूर : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर बिजापूर जिल्ह्यातील अबुझमाड इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात रविवारी सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत १००० हून अधिक सैनिकांनी ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत दोन डीआरजी आणि एसटीएफ जवान हुतात्मा झाले. दोघे जवान जखमीही झाले आहेत. जवानांनी १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे.
उद्यानामध्ये एका भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. यावेळी झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले जवान डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड आणि स्पेशल टास्क फोर्स चे होते. त्यांचा नक्षलवादविरोधी कारवायांमध्ये तज्ज्ञ असलेल्या राज्यस्तरीय दलामध्ये समावेश होता. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.उद्यान परिसरात शोधमोहीम सुरू आहे, अशी माहिती बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली. दरम्यान, बिजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव म्हणाले की, मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढत आहे. हे एक मोठे ऑपरेशन आहे. बॅकअप पार्टी पाठवली आहे.
अबुझमाडला लागून असलेल्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाचा हा भाग नक्षलवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे मानले जाते. २,७९९.०८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे उद्यान महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. १९८३ मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले होते.
या वर्षी आतापर्यंत छत्तीसगडमध्ये ८१ नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यापैकी ६५ बस्तर विभागात मारले गेले. त्यात विजापूरसह ७ जिल्हे समाविष्ट आहेत. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी लढताना ११ जवानांनी प्राण गमावले आहेत. या वर्षात बिजापूर येथील ५ जणांसह किमान ९ जणांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २०२४ मध्ये सैनिकांनी वेगवेगळ्या चकमकीत २१९ नक्षलवाद्यांना ठार मारले होते.