समर्पणाची भावना

समग्र अर्पण म्हणजे समर्पण असं म्हणता येईल. ही एक उदात्त स्वरूपाची भावना असते. इथे आपल्या कर्तेपणाची भावना उरत नाही. एखाद्याच्या मनात दुसऱ्या विषयीची आदराची, प्रेमाची भावना अति तीव्र असते तेव्हा अशी समर्पण करण्याची इच्छा निर्माण होते.

Story: मनातलं |
08th February, 04:39 am
समर्पणाची भावना

आपलं मन म्हणजे विविध भावनांचं रसायन आहे. मानवी मनात होणाऱ्या आंदोलनांना भावना असं म्हणतात त्यात कुणाची कुठली भावना प्रबळ हे त्या त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार ठरत असते. कुणी देशासाठी, कुणी प्रेमासाठी, कुणी कर्तव्यासाठी किंवा अगदी जिवलग प्राण्यासाठी सुद्धा समर्पण करताना दिसतात. जिथे खरे खुरे प्रेम असते तिथे समर्पणाची भावना असते. त्यामुळे त्या प्रेमाला एक उदात्तता येते. त्यावेळी अगदी ताटात वाढलेला आवडीचा पदार्थ असेल किंवा जीवनात लाभलेले प्रेम असेल त्यागामुळे त्याचा मोठेपणा दृष्टीपथात येतो. 

समग्र अर्पण म्हणजे समर्पण असं म्हणता येईल. ही एक उदात्त स्वरूपाची भावना असते. इथे आपल्या कर्तेपणाची भावना उरत नाही. एखाद्याच्या मनात दुसऱ्या विषयीची आदराची, प्रेमाची भावना अति तीव्र असते तेव्हा अशी समर्पण करण्याची इच्छा निर्माण होते. एखाद्यासाठी जीव अर्पण करणे, जीव ओवाळून टाकणे म्हणजे समर्पण. देशासाठी मनात सतत प्रेमभावना जागृत ठेवून देशाला स्वतंत्र करायची उत्कट भावना ठेवल्याने आपला देश पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त झाला त्यासाठी अशा कैक देशप्रेमी लोकांनी समर्पण केले, आपला जीव ओवाळून टाकला. त्यांच्या समर्पणाची गोड फळे आपण चाखतो आहोत याची प्रत्येकाने मनात जाणीव बाळगली पाहिजे. तरच त्यांचे जीवनदानाचे, समर्पणाचे चीज झाले असे वाटेल. 

संतांनी आपले सारे आयुष्य जीवन परमेश्वराच्या सेवेत, त्याच्या चरणी वाहून घेतलेले असते ही त्यांची समर्पणाची भावना त्यांना मोठा विलक्षण आनंद देणारी असते. भगवंताच्या नामस्मरणात दिवस रात्र स्वत:ची  तहान भूक विसरून त्याच्याशी एकरूप होणारी त्यांची भक्ती हे खरे समर्पण. तन-मन-धन सर्व अर्पण करणे म्हणजे समर्पण. त्याग म्हणजे काय ते शिकवते. मीरेचे श्रीकृष्णाच्या भक्तीतले समर्पण विषाचा प्याला सहज ओठाला लावणारे होते. तिचा श्रीकृष्णावर इतका विश्वास तिच्या भक्तीत आणि प्रेमावर होता. समर्पणात विश्वास महत्त्वाचा असतो. एकदा एक तरुण युवक संत कबीर यांना प्रश्न विचारायला येतो लग्न कशाला करायचं? मी लग्न करू की नको? तेव्हा कबीर त्यांच्या पत्नीला कंदील घेऊन यायला सांगतात. युवकला प्रश्न पडतो, दिवसा कंदील कशाला हवा? पण त्यांची बायको कसलाही प्रश्न न विचारता कंदील घेऊन येते. हा तिचा जो प्रेमावरचा विश्वास तो तुझ्यात असेल, तर तू लग्न कर. नाही तर लग्न करू नकोस. असा कबीर त्याला सल्ला देतात. 

प्रेम आणि भक्ती यामध्ये संशय, अविश्वास आला की शंका-कुशंका निर्माण होतात, भांडण तंटे, ताणतणाव यामुळे भावना कुंठित होतात म्हणून समर्पित भावनेने केलेले प्रेम असो की भक्ती तिथे शंकेला स्थान नसते. प्रेम म्हणजेच समर्पण किंवा त्याग ही भावना मनात असली पाहिजे. हाती घेतलेले कुठलेही कार्य असो ते समर्पित भावनेने केले की मनाची एकाग्रता वाढते त्या कार्यात स्वतःला झोकून दिलं की त्याची परिणती चांगलीच होणार. पूर्णपणे डेडिकेशन, समर्पणाची भावना त्यात हवी. नदी जेव्हा सागराला मिळते तेव्हा संपूर्णपणे समर्पणाची भावना उराशी बाळगूनच तिचे सागराशी मिलन होत असते. नदीचे हे रुपक आत्मा-परमात्मा यांच्या मिलनाशी जुळते. 

समर्पण हे हृदयाशी जाऊन पोहचते. त्या क्षणापासून  भक्तीची भावना जास्त प्रबळ होत जाते. भक्तीभावने बरोबर समर्पण येतेच. आपल्या पूजेच्या विधिकडे बारकाईने लक्ष दिले की कळते भटजीद्वारे आपण जे जे देवाला समर्पित करतो फळे, फुले, नैवेद्य, पाणी, तीर्थप्रसाद म्हणून खाद्य पदार्थ, ओटी, कपडे तेव्हा त्यावर पळी ने पाणी सोडून समर्पयामी असं म्हणतो. मी हे मनाने आणि शरीराने देवाला अर्पण करत आहे असा त्याचा अर्थ होतो. तो विचार किंवा ते तत्त्व आपण मनापासून मान्य करतो, स्वीकारतो. स्त्री ही आई, बहीण, पत्नी अशा अनेक भूमिकेत आपल्या आजूबाजूला दिसत असते ती एक समर्पणाचे जीवंत उदाहरण म्हटले पाहिजे. त्याग आणि समर्पण तिच्या रगारगात सामावलेले असते. रामायणातील राम, पत्नी सीता असो, की लक्ष्मणाची पत्नी उर्मिला असो दोघी समर्पणाच्या मूर्तिमंत उदाहरणे आहेत. 

पुरुषांमध्येही ही भावना असते. बहिणीचे लग्न झाले नाही म्हणून आजन्म अविवाहित राहणारे भाऊ मी पाहिले आहेत. पहिले प्रेम यशस्वी झाले नाही पण तरीही तिच्या आठवणीत आयुष्य घालवत लग्न न करता आपले आयुष्य त्या प्रेमावर समर्पित करणारे पुरुषही दिसतात. मित्रासाठी आपले प्रेम मनात लपवून ठेवत समर्पण करणारे मित्रही दिसतात. महाभारतात हस्तिनापुरवरचा राज्याधिकार त्याग करून विवाह न करता आजन्म ब्रम्हचारी राहणारा मुलगा आपल्या पित्यासाठी आणि माता सत्यवतीसाठी इतकं मोठं समर्पण करतो. 

आपल्या इतिहासातले दाखले आपल्याला समर्पणाचे महत्त्व पटवून देतात. ज्याला मनोमन गुरु मानून धनुर्विद्या अवगत केली त्या एकलव्याने आपल्या गुरूला त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून हाताचा अंगठा मागितला तो देवून समर्पण काय असतं ते दाखवून दिलं. हातचे काहीही राखून न ठेवता सर्व घटकांनीशी जे स्वतःला ईश्वरास समर्पित करतात अशा साधकांना ईश्वर स्थिरता, ज्ञान, प्रकाश, शक्ती, सामर्थ्य, परमानंद, स्वातंत्र्य, विशालता, ज्ञानाची उत्तुंगता आणि आनंदसागर या गोष्टी प्रदान करतो असे अरविन्द यांचे म्हणणे होते. आणि याची प्रचिती आलेली दिसते. सामान्य जीवनात कुणी खेळासाठी, कुणी संशोधनासाठी, कुणी गरिबांसाठी, कुणी रोग्यांसाठी, कुणी पीडितांसाठी, कुणी शिक्षणासाठी आपले सर्व जीवन समर्पित करतात त्यांना जागतिक पातळीवर ओळखले जाते नावलौकिक तर मिळतोच, शिवाय जगभर त्यांचे नाव अजरामर होते. ही किमया समर्पण केल्याने घडते. 


प्रतिभा कारंजकर, फोंडा