इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंटच्या वादातून मारहाण; ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th February, 12:09 am
इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंटच्या वादातून मारहाण;  ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

म्हापसा : कुमया मरड, गिरी येथे वास्तू प्लाझा इमारतीमध्ये वेगळा इलेक्ट्रिक चार्जर बसवून वीज चोरी केल्याबद्दल विचारल्याच्या कारणास्तव रहिवासी वासुदेव शिरोडकर व सनी कारेकर यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संतोष जैस्वाल कुटुंबीयांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
ही घटना सोमवारी उत्तररात्री १२.३० च्या सुमारास घडली. वास्तू प्लाझामध्ये रहिवाशांनी इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉईंट बसवला आहे. मात्र, याच्या वीज बिलाची रक्कम जैस्वाल कुटुंब भरत नसल्याने रहिवाशांनी त्यांना चार्जिंग पॉईंट वापरण्यास आक्षेप घेतला होता. रविवारी रात्री संशयित जैस्वाल भावंडांनी दुसरा इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट उभारला असल्याचे फिर्यादी शिरोडकर यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मध्यरात्री संतोष जैस्वाल व त्याचे मंजित व आर्यन हे भाऊ सनी कारेकर यांच्या फ्लॅटसमोर आले असता त्यांनी सनी यांचा हात पकडून त्यांना तसेच त्यांच्या पत्नीला धक्काबुक्की केली.
यावेळी त्यांच्या मदतीला फिर्यादी शिरोडकर गेले असता संशयित बाप-लेकांनी आपल्या इतर साथीदारांच्या सहाय्याने शिरोडकर यांच्यावर क्रिकेट बॅटने हल्ला चढवला. संशयितांच्या तावडीतून सुटून शिरोडकर यांनी आपल्या फ्लॅटमध्ये धाव घेतली. तेव्हा बंद दरवाजाचीही संशयितांनी मोडतोड केली. तसेच शिरोडकर यांच्या आईलाही धक्काबुक्की करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी तसेच संशयितांना पोलीस स्थानकावर आणले. जखमीवर गोमेकॉत उपचार करण्यात आले. नंतर पोलिसांनी शिरोडकर यांची तक्रार नोंदवून घेतली.
संशयितांसह तक्रारदारालाही अटक
याप्रकरणी सोमवारी रात्रीपर्यंत पोलीस संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करीत नसल्यामुळे शिरोडकर कुटुंबीय तसेच मित्रपरिवाराने पोलीस स्थानकात गराडा घातला. त्यानंतर रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच संशयित मंजित जैस्वाल यास पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा नोंदवून फिर्यादी वासुदेव शिरोडकर व सनी कारेकर या दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा