मडगाव : मनोरुग्ण युवतीवर सामूहिक बलात्कार करणार्या पाच संशयितांना फातोर्डा पोलिसांकडून अटक झाली होती. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वी दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
मानसिक स्थिती चांगली नसलेल्या युवतीचे फातोर्डा येथून अपहरण करत कांसावलीतील एका गेस्ट हाउसवर नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याची २२ जानेवारी रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर फातोर्डा पोलिसांनी लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंद केला.
दक्षिण गोवा जिल्हा पोलिसांच्या पथकांनी सीसीटीव्ही मॅपिंगचा वापर करत संशयित आदिल अब्दुल करीम लाबसाब अलगर (१८, रा. विद्यामंदिर चिखली, वास्को), मोहम्मद अली मुल्ला (२२, रा. मांगुरहिल, वास्को), शाहजाद मोहम्मद समीम शेख (१८, रा. खारीवाडा, वास्को), विरेश अमरीश अग्वांदा (१८, रा. गांधीनगर, वास्को) व मोहम्मद यासिर हबिबुल्ला शेख (१८, रा. सडा, वास्को) यांना अटक केली होती. याप्रकरणात संशयितांनी वापरलेली वाहने व मोबाइलही जप्त केले होते. रेंट अ कारचा परवाना रद्दची व गेस्ट हाउसचा परवाना रद्दची शिफारसही पोलिसांकडून करण्यात आली होती. न्यायालयात हजर केले असता संशयितांना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी सुनावली होती, त्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तीन दिवसांची पोलीस कोठडी संपुष्टात आल्यानंतर पाचही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे. न्यायालयाकडून आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.