मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ९ गड्यांनी पराभव करून इतिहास रचला आणि संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. या सामन्यात टीम इंडियाची सलामीवीर फलंदाज गोंगाडी त्रिशा आणि वैष्णवी शर्मा या दोघांनीही मोठी कामगिरी केली. या स्पर्धेत गोंगाडी टीम इंडियासाठी मॅचविनर ठरली, ज्यामध्ये तिने ३०० पेक्षा जास्त धावा केल्या, तर वैष्णवी शर्मा स्पर्धेत १७ गडी बाद करून विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली.
त्रिशाने १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात, एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. त्रिशाने या स्पर्धेत ७ सामन्यात फलंदाजी केली, ज्यात तिने ७७.२५ च्या सरासरीने ३०९ धावा केल्या. त्रिशाने श्वेता सेहरावतचा विक्रम मोडला, जिने २०२३ मध्ये झालेल्या आयसीसी महिला १९ वर्षांखालील विश्वचषकात ७ डावांमध्ये ९९ च्या सरासरीने एकूण २९७ धावा केल्या होत्या. या स्पर्धेत गोंगाडीच्या फलंदाजीची शतकी खेळीही दिसून आली, तर ती ३ डावांमध्ये नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतली. अंतिम सामन्यातही गोंगाडीने ३३ चेंडूत ४४ धावांची नाबाद खेळी साकारली.
त्रिशाला क्रिकेटपटू बनवण्यासाठी तिच्या वडिलांनी अनेक मोठे त्याग केले. त्रिशाचे वडील भद्राचलममध्ये खासगी नोकरी करायचे, पण जेव्हा त्यांना दिसले की त्यांची मुलगी क्रिकेटकडे झुकत आहे, तेव्हा त्यांनी त्रिशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडून भद्राचलमहून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. नंतर भद्राचलम सोडून सिकंदराबाद या मोठ्या शहरात गेले. इथेच ७ वर्षांच्या त्रिशाला क्रिकेट अकादमीत दाखल करण्यात आले. त्रिशाने तिच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने तिने वडिलांची मेहनत वाया जाऊ दिली नाही. भारतासाठी सलग २ अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत चमकदार खेळी खेळून तिने इतिहास रचला.
टीम इंडियाची डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माने २०२५ च्या १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला. ज्यामध्ये तिने ६ सामन्यांमध्ये ४.३५ च्या सरासरीने एकूण १७ विकेट्स घेतल्या. वैष्णवी आता आयसीसी महिला १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज बनली आहे. वैष्णवी, त्रिशा या दोघीही खऱ्या अर्थाने १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.