शिक्षण खात्याकडून परिपत्रक जारी
पणजी : शिक्षण संचालनालयाने सर्व शालेय व्यवहार करण्यासाठी विद्यार्थ्यांकरीता अपार कार्ड अनिवार्य केले आहे. शाळा बदल, माध्यान्ह आहार आणि इतर सरकारी योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना अपार कार्डच्या माध्यमातूनच मिळणार आहे. त्यामुळे शिक्षण संचालनालयाने सर्व शाळांना विद्यार्थी अपार कार्ड देण्याचे काम जलदगतीने करण्याचे निर्देश दिले आहेत.
शिक्षण क्षेत्रात डिजिटायझेशन करण्यासाठी गोवा सरकारने अलीकडेच विद्यार्थ्यांना बारा अंकी अपार ओळखपत्रे देण्याची घोषणा केली होती. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक नोंदी आणि त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल ओळख प्रदान करणे, हा यामागील उद्देश आहे.
शिक्षण खात्याने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले की, विद्यार्थ्यांची प्राथमिक ओळख म्हणून वापर करण्याच्या उद्देशाने शाळा बदली आणि इतर ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी अपार कार्ड दाखवणे सक्तीचे आहे. तसेच मोफत पाठ्यपुस्तके, माध्यान्ह आहार आणि इतर सरकारी फायदे घेण्यासाठी सदर कार्ड अनिवार्य असणार आहे.
सर्व शाळा प्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्र तयार करण्याची प्रक्रिया जलदगतीने होण्यासाठी जबाबदारी घ्यावी. तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना याबाबतची माहिती देण्यासाठी या परिपत्रकाची एक प्रत शाळेच्या सूचना फलकावर लावावी. - शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक