पेडणे : वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या मुलांना भोम-पालये पठार, हरमल येथे बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेत चारजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी चार स्थानिक युवकांना अटक केली आहे.
जखमींना सुरुवातीला उपचारासाठी तुये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरा त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. घटना समोर आल्यानंतर मांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच घडलेल्या घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंगुर्ल्याहून आलेले पर्यटक भोम, पालये येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत होते. यावेळी स्थानिकांनी त्यांना जाब विचारला. यावरून स्थानिक आणि पर्यटक युवक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. याचे पर्यवसान मारामारीत झाले. स्थानिकांनी पर्यटकांना बेदम चोप दिल्याचे समोर आले आहे.
मांद्रे पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांनी सांगितले की, ३० रोजी वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथील रिचर्ड मॅन्युअल डिसोझा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ रोजी सायं. ६ वा. ते आपल्या मित्रांसोबत पालये भोम येथे आले होते. त्या ठिकाणी संशयित ब्रिजेश वस्त, नाना साठेलकर व इतर चार-पाच अनोळखी व्यक्तींनी आपणास मारहाण केली. शिवाय आपले मित्र आनंद डिचोलकर यांना शिवीगाळ आणि ऑल्विन फर्नांडिस यांना मारहाण केल्याची तक्रार रिचर्ड डिसोझा यांनी दिल्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. तक्रारदारास त्याच्या मित्रांनाही मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याने त्यांना बांबोळी येथील गोमेकॉत उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्यांची स्कूटर आणि किमती ५० हजाराच्या फोनचेही संशयितांनी नुकसान केले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून मांद्रे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पालेकर पुढील तपास करीत आहेत.
चारही आरोपींना अटक
या प्रकरणातील चारही संशयित आरोपींना मांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये ब्रिजेश वस्त (३०, वस्तवाडा-हरमल), इनासियो डिसोझा (३४ गिरकरवाडा-हरमल), विठू गावडा (४३, मधलावाडा-हरमल) आणि उल्हास पोळजी (२६, कोरगाव-पेडणे) अशी संशयितांची नावे आहेत.