पणजी : सरकारने अनेक निर्बंध लादलेले असूनही त्याकडे सोईस्कर कानाडोळा करत राज्यात बेकायदा रेती उपसा सुरूच आहे. किनारी पोलिसांनी ठिकाठिकाबी धडक कारवाईचे स्तर अवलंबले असून, त्यांच्याकडून वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारला जातो. दरम्यान काल रात्री ११ वाजता उगवे गावातील तेरेखोल नदीच्या पात्रात सुरू असलेल्या बेकायदा रेती उपशाकडे येथील १०० ते १५० दक्ष ग्रामस्थांनी मोपा, पेडणे आणि किनारी पोलिसांचे लक्ष वेधले.
प्राप्त महितीनुसार, येथे तब्बल ३० ते ३५ होड्या बेकायदा रेती उपसण्याचे काम करतात. विशेष म्हणजे संध्याकाळीच किनारी सुरक्षा पोलीस दलाचे अधीक्षक राजू राऊत देसाई यांनी केरी-तेरेखोल, किरणपाणी, पोरस्कडे भागात भेट देत पाहणी केली होती. यावेळी त्यांनी बेकायदा रेती व्यवसायावर कडक पहारा ठेवण्यासाठी उभारलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला . याप्रसंगी किनारी उपअधीक्षक सलीम शेख तसेच निरीक्षकांचीही उपस्थिती होती. पोलीस गेल्यानंतर त्यांनी हे काम पुन्हा सुरू केले. आता पोलीस या सर्वांवर काय कारवाई करेल याच्याकडे येथील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, कालच पणजी येथील किनारी पोलिसांनी मांडवी नदीपात्रात रेती उपसा करणाऱ्या तब्बल १७ संशयितांसह एका आरोपीस अटक करून एक बोट आणि ५ क्यूबिक मीटर रेती असा १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता