सासष्टी : मडगावात ७ फेब्रुवारीपासून सारस्वत फूड अँड कल्चरल फेस्टिवलचे आयोजन

विविध खाद्यपदार्थांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात असेल

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
4 hours ago
सासष्टी : मडगावात ७ फेब्रुवारीपासून सारस्वत फूड अँड कल्चरल फेस्टिवलचे आयोजन

मडगाव : गोवा सारस्वत समाजातर्फे सारस्वत फूड अँड कल्चरल फेस्टिवल २०५ चे आयोजन ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आलेले आहे. हा महोत्सव मडगाव येथील एसजीपीडीएच्या मैदानावर होणार आहे. यावेळी विविध खाद्यपदार्थांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही उपस्थितांना घेता येणार आहे.

 मडगाव येथील पत्रकार परिषदेत सारस्वत फूड अँड कल्चरल फेस्टिवलची माहिती देण्यात आली. यावेळी गोवा सारस्वत समाज अध्यक्ष डॉ. देश प्रभुदेसाई, सरचिटणीस नवनाथ खांडेपारकर, खजिनदार राजेश प्रभू, आयोजन समिती अध्यक्ष नरेश घोडगे, मठग्रामस्थ सारस्वत समाज अध्यक्ष दामोदर बोरकर व उमेश कामत तसेच शर्मद रायतूरकर उपस्थित होते. या महोत्सवाचे उद्घाटन ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. यावेळी आमदार दिगंबर कामत, आमदार दाजी साळकर, व नगरसेवक  सगुण नाईक उपस्थित असतील. समारोप समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय सरदेसाई व दवर्ली दिकरपाल सरपंच साईश राजाध्यक्ष उपस्थित असतील.   

या महोत्सवात ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता टाकाउतून टिकाउ या स्पर्धेचे चार गटात आयोजन केलेले आहे. तर फुलांची सजावट स्पर्धा दोन गटात होणार आहे. याशिवाय फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन व्यासपीठावर करण्यात आलेले आहे. सायंकाळी ७ ते १० या वेळेत डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी ८ रोजी सायंकाळी ४ वाजता फेस पेंटींग, क्रोचेट मेकींग स्पर्धा व हँड एम्ब्राडरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर व्यासपीठावर दुपारी साडेतीन वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार एअर मार्शल संदेश वागळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर ६ वाजता गीतगायन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनउ वाजता लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा व सुदृढ बालक या स्पर्धा घेतल्या जातील. साडेदहा वाजता व्रॅपिंग कलेची स्पधेचे आयोजन केलेले आहे. तर सायंकाळी चार वाजता कोकणी मेजवानी हा पाककलेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

त्याशिवाय व्यवसाय कल्पना स्पर्धा होणार आहे. यात युवकांच्या नव्या संकल्पनांना वाव मिळणार आहे. त्यांच्या कल्पना ऐकून युवकांना काहीतरी नवे करण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल. यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. याशिवाय शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजता सारस्वत कुमारी आणि कुमार स्पर्धा, मिस्टर आणि मिसेस सारस्वत, मिस सारस्वत, मिस्टर सारस्वत स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होईल व या कार्यक्रमांचा शेवट सारस्वत फॅशन शोने होणार आहे.  

सारस्वत महोत्सवाच्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी खास बुथची सोय केली जाणार आहे. या महोत्सवाला येणार्‍या व्यक्तींना ७ फेब्रुवारी दुपारी तीन ते ९ फेब्रुवारी दुपारी ३ या वेळेत कुटुंबीयांसह याठिकाणी सेल्फी घेता येणार आहे. ही सेल्फी दिलेल्या क्रमांकावर पाठवून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

हेही वाचा