देवस्थानच्या महाजनांची मागणी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन यादीत बेकायदा नावे घुसवल्याचा आरोप
म्हापसा : येथील श्री देव बोडगेश्वर संस्थानतर्फे देवस्थान प्रशासकांना सादर केलेल्या महाजन यादीत नवीन समाविष्ट केलेल्या २५४ नावांना काही महाजनांनी आक्षेप घेतला आहे.
देवस्थानच्या कार्यकारी मंडळाच्या मान्यतेविना ही नावे शेवटच्या क्षणी आणि बेकायदेशीररीत्या महाजनांच्या अंतिम यादीत घुसवली गेल्याचा दावा करत ही नावे रद्दबातल करण्यात यावी, अशी मागणी संतोष बेळेकर व इतर महाजनांनी देवस्थानचे अध्यक्ष तसेच देवालय प्रशासकांकडे केली आहे.
गेल्या २१ जानेवारी रोजी देवालय प्रशासक तथा मामलेदारांना येत्या ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी मंडळाने २३५८ महाजनांची यादी सादर केली होती.
त्यापूर्वी कार्यकारी मंडळाने ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत महाजनांच्या सदस्यपदाचे नूतनीकरण केले होते. त्यावेळी या अंतिम यादीत अनुक्रमे २१०४ नावे होती. मात्र त्यानंतर देवस्थानच्या कार्यकारी मंडळाचे सचिव व इतर पदाधिकाऱ्यांनी संगनमताने, फसवणूक करून तसेच व्यवस्थापकीय कार्यकारी समितीची बैठक घेऊन वैध ठराव न घेता आणि केवळ निवडणुकीत विजय मिळवण्याच्या उद्देशाने ही अतिरिक्त २५४ नवीन नावे चुकीच्या पद्धतीने महाजन यादीत जोडली गेली आहेत, असा आरोप या हरकत पत्रात तक्रारदार महाजनांनी केला आहे.
देवस्थान नियमावली कायद्यानुसार देवस्थान समितीचे कारकून किंवा सचिव यांनी दि. १५ जानेवारी २०२५ पर्यंत महाजनांची यादीची प्रत सदस्यांना तपासणीसाठी मंदिर कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच स्थानिक वृत्तपत्रात किंवा सरकारी राजपत्रात पूर्वसूचना देऊन लावायला हवी.
मात्र २० जानेवारी २०२५ पर्यंत संस्थानच्या महाजनांची अशी अंतिम यादी देवस्थानच्या सूचना फलकावर लावली गेली नव्हती. ही यादी संस्थानच्या २०२५ - २०२८ कालावधीसाठी होणाऱ्या समितीची निवडीसाठी पात्र मतदार यादी म्हणून वापरली जाणार होती.
समितीच्या सचिवांनी दि. १५ जानेवारी रोजी महाजनांची अंतिम यादी प्रशासकांकडे सादर केली होती. त्यात २५४ नवीन व्यक्तींची भर पडली होती. त्यामुळे ही नावे यादीतून वगळण्यात यावी आणि आगामी निवडणूकीसाठी अनुक्रमे २१०४ पर्यंतचीच महाजनांची यादी ग्राह्य धरावी.
अनुक्रमे २१०५ ते २३५८ पर्यंत जोडली गेलेली नावांसंबंधीत व्यवस्थापन समितीचा ठराव, नोंद वही सारखी कागदपत्रे आम्हाला द्यावी. तसेच नवीन सदस्यांशी संबंधित सर्व रेकॉर्ड, कागदपत्रे तपासणीसाठी सादर करण्याचे निर्देश समितीच्या सचिवांना द्यावेत, अशी मागणी या महाजनांनी तक्रार पत्रात केली आहे.
अहवाल सादर केला !
बोडगेश्वर देवस्थानच्या कार्यकारी मंडळ समितीची बैठक गेल्या सोमवारी २७ जानेवारी रोजी संपन्न झाली. काही महाजनांनी प्रशासकांकडे केलेल्या तक्रारीच्या अनुसार या बैठकीचा अहवाल आम्ही देवस्थानच्या प्रशासकांना सादर केला आहे.
- आनंद भाईडकर, अध्यक्ष, श्री बोडगेश्वर संस्थान.