शिक्षण : एप्रिलपासून होणार नवीन शैक्षणिक वर्ष सुरू ; परिपत्रक जारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th January, 04:10 pm
शिक्षण :  एप्रिलपासून होणार नवीन शैक्षणिक वर्ष सुरू ; परिपत्रक जारी

पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) कार्यवाहीसाठी नवे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. इयत्ता सहावी ते दहावी व बारावीचे वर्ग एप्रिलमध्ये सकाळी ११.३० वाजेपर्यंत चालतील. १ मे ते ३ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असेल. यानंतर ४ जूनपासून पूर्वीच्या वेळेप्रमाणे वर्ग सुरू राहतील. शिक्षण संचालकांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. 

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आठवड्याला  ३६ ते ३९ तास शिकवणी होणे आवश्यक आहे. हे तास भरून काढण्यासाठी एक तर शैक्षणिक दिवस वाढवावे लागतील किंवा शाळा/विद्यालयांच्या वेळा वाढवाव्या लागतील. शिकवणीचे तास भरून काढण्यासाठीच एप्रिलमध्ये वर्ग घेण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत सकाळी ११.३०पर्यंत वर्ग घेतल्याने शिकवणीचे तास भरून येणार आहेत.

यापूर्वी शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू व्हायचे. यामुळे अंतिम परीक्षा झाली की विद्यार्थ्यांना एप्रिलनंतर सुट्टीच असायची. यामुळे महिन्यापेक्षा अधिक दिवस सुट्टी मिळायची. आता ही प्रथा बंद होणार आहे. यंदा नववीसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही सुरू झाली आहे. यैत्या शैक्षणिक वर्षी सहावी व दहावीसाठी एनईपी लागू होईल. दहावीचा निकाल लागून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला  उशीर होतो. यामुळे इयत्ता अकरावीचे शैक्षणिक वर्ष जूनमध्येच सुरू होणार आहे

हेही वाचा