पणजी : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दहावी किंवा बारावीच्या समांतर दर्जाची शैक्षणिक पात्रता देण्याबाबत विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले. गुरुवारी पणजीत डिचोली , फार्मागुढी , वास्को, काकोडा आणि म्हापसा येथे उभारण्यात येणाऱ्या सेंटर ऑफ एक्सलंसच्या व्हर्च्युअल पायाभरणी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक एस एस गावकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आठवी उत्तीर्ण आणि दहावी अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याने एका वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करावा. त्याची शैक्षणिक पात्रता ही दहावीच्या समांतर दर्जाची समजण्यात येईल. यासाठी शिक्षण खात्याकडून लवकरच आदेश काढण्यात येईल. सरकारी कार्यालयात एमटीएस पदासाठी दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. नवीन नियम आल्यावर दहावीत अनुत्तीर्ण पण आयटीआय झालेले विद्यार्थी देखील सरकारी खात्यात एमटीएस पदासाठी अर्ज करू शकतील.
ते म्हणाले, याशिवाय दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याने दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्याची शैक्षणिक पात्रता ही बारावीच्या समान दर्जाची गृहीत धरण्यात येणार आहे. त्या विद्यार्थ्याला सध्याच्या नियमाप्रमाणे शालान्त मंडळाच्या दोन भाषा विषयांची परीक्षा द्यावी लागणार नाही. तो विद्यार्थी बारावी उत्तीर्ण आहे असे समजले जाईल. यासाठी अभ्यासक्रमात काही बदल करावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांना बीए किंवा बीकॉमसाठी देखील प्रवेश घेता येईल. पुढील वर्षापासून याची अंमलबजावणी होणार आहे.
पूर्वी काही जमत नसेल किंवा अनुत्तीर्ण झाल्यावर तर आयटीआय करण्याचा सल्ला दिला जात असे. आम्ही ही मानसिक बदलली आहे. सरकारने आयटीआयतून कौशल्य विकास उपक्रम सुरू केले आहेत. गोव्यातील सर्व आयटीआयना आयएसओ नामांकन मिळाले आहे. आज पायाभरणी केलेल्या सेंटर ऑफ एक्सलंसमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. यासाठी टाटा टेक्नॉलॉजीने १६५ कोटी तर गोवा सरकारने सुमारे ३५ कोटी रुपये खर्च केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.