किनारी सुरक्षा, पर्यटन सुविधांबाबत संबंधितांकडून मागवल्या सूचना
पणजी : शॅकमधील कर्मचाऱ्यांचे वर्तन आणि इतर व्यवहारांवर यापुढे पोलिसांचे बारकाईने लक्ष असेल. त्याचबरोबर शॅक कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्याचा प्रस्तावही पर्यटन खात्याने ठेवला आहे. हरमल समुद्रकिनाऱ्यावर शॅक कर्मचाऱ्यांनी केलेल्या भांडणात अमर दत्ताराम बांदेकर यांचा मृत्यू झाल्यानंतर समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
किनारी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आणि ठोस उपाययोजना आखण्यासाठी गुरुवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी पर्यटन, पोलीस, वाहतूक, पंचायत, हवाई वाहतूक खात्याचे सचिव तसेच अधिकारी उपस्थित होते. पर्यटकांची सुरक्षा आणि पर्यटन वाढविण्याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला वाहतूक सचिव संजय गोयल, पर्यटन सचिव संजय आहुजा, बंदर सचिव चेश्टा यादव, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, उद्योग सचिव सुनील अंचिपाका, पर्यटन संचालक केदार नाईक व इतर अधिकारी उपस्थित होते.
शॅकमालकांकडून अलीकडे कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत शॅक कर्मचाऱ्यांकडून दोन खून झाले आहेत. तर अन्य चार जणांवर चाकूने वार करण्यात आले आहेत. या घटनांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून त्यामुळे गोवा पर्यटकांसाठी सुरक्षित नसल्याचा संदेश सर्वदूर पसरण्यास मदत होत आहे.समुद्रकिनाऱ्यांवर दारूच्या बाटल्या इतरत्र टाकण्याचे प्रकार बंद व्हायला हवेत. यासाठी पोलीस आणि अबकारी शुल्क खात्यांना उपाययोजना करावी लागणार आहे. पर्यटन वाढ, पर्यटन सुरक्षा आणि सुविधांना चालना देण्यासाठी उपाययोजनांबाबत सर्व संबंधितांकडून सूचना मागवण्यात आल्या असून त्या विचारात घेतल्यानंतर कारवाई केली जाईल, असेही बैठकीत ठरवण्यात आले.
शॅकमालकांकडून अतिक्रमणात वाढ
शॅकवाल्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असून शॅकमधील टेबल-खुर्च्या अव्यवस्थितरीत्या मांडल्यामुळे वाद निर्माण होतात. तसेच शॅकमालकांकडून होणाऱ्या अतिक्रमणातही वाढ झालेली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या अशा शॅकमालकांवर यापुढे कारवाई करण्यात येईल, तसेच दिलेल्या वेळेत शॅक बंद करण्यावरही पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.